मिथक शिल्पे – शिल्प आणि चित्रांचा संदर्भ

>> आशुतोष बापट

साहित्यातील संदर्भ पाहिल्यानंतर आपण या काल्पनिक विश्वातील प्राण्यांचे अजून कुठे कुठे संदर्भ येतात हे शोधायला गेलो की, अर्थातच कलेमध्ये त्याचे पडलेले प्रतिबिंब स्पष्ट दिसून येते. मुळात साहित्यात जे संदर्भ आले आहेत त्याचे रूपांतर कलेत होणे हे अगदी क्रमप्राप्तच आहे म्हणा. ‘मिथीकल अॅनिमल्स इन इंडियन आर्ट’ या आपल्या पुस्तकात श्री. के. कृष्णमूर्ती यांनी या संकल्पनेचा सगळा ऐतिहासिक आढावा घेतलेला आहे. त्या पुस्तकावर आधारित असलेले आणि अजून बरेच निरनिराळे संदर्भ जोडून प्रसाद प्रकाशनाने ‘मिथक शिल्पे’ हे पुस्तक प्रकाशित केले. या पुस्तकात के. कृष्णमूर्ती यांनी विचारात घेतलेली ‘इहामृग’ ही संकल्पना, त्याचे कलेत पडलेले प्रतिबिंब हे मांडले आहेच, पण त्याशिवाय श्री. ढाकी यांनी पुढे मांडलेली ‘व्याल’ ही संकल्पना आणि त्याचे हिंदुस्थानी कलेत दिसणारे रूप याचासुद्धा विचार केला आहे. तसेच के. कृष्णमूर्ती यांनी सांची, अमरावती, नागार्जुनकोंडा इथली शिल्पे आणि अजिंठा लेणीतील भित्तिचित्रे यांचाच समावेश त्यांच्या पुस्तकात केला आहे. मात्र मराठी पुस्तकात विविध लेण्यांमध्ये दिसणारे हे काल्पनिक प्राणी आणि पुढे मंदिरांवर विपुल प्रमाणावर दिसणाऱया व्याल प्रतिमा यांचासुद्धा समावेश केलेला आहे.

के. कृष्णमूर्ती यांनी त्यांच्या पुस्तकात म्हटले आहे की, त्यांनी फक्त इ.स.च्या 6व्या शतकापर्यंतचा कालावधी लक्षात घेऊन त्या कालावधीत आढळणारी मिथक शिल्पे विचारात घेतली आहेत. कारण पुढे श्री. ढाकी यांनी ‘व्याल’ ही संकल्पना त्यांच्या पुस्तकातून विस्तृतपणे उलगडून दाखवली. त्यांनी ‘द व्याल फिगर्स ऑन द मेडिएव्हल टेंपल्स ऑफ इंडिया’ या त्यांच्या पुस्तकात ‘व्याल’ या संकल्पनेबद्दल खूप सखोल अभ्यास मांडला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार अंदाजे इ.स.च्या 4थ्या शतकापासून ‘व्याल’ ही संकल्पना विकसित झाल्याचे दिसून येते.

वर म्हटल्याप्रमाणे श्री. के. कृष्णमूर्ती यांनी इहामृगाचे कलेतील संदर्भ शोधण्यासाठी भारहूत, सांची, अमरावती, नागार्जुनकोंडा, मथुरा आणि गांधार इथली शिल्पे आणि अजिंठा लेण्यांतली चित्रे यांचा विचार इथे केला आहे. हिंदुस्थानी कलेवर परदेशी कलेचा किती प्रभाव पडतो हेसुद्धा इथे दिसून येते. शिल्पातून दिसणारे हे इहामृग म्हणजे कलाकारांच्या अफलातून कल्पनाशक्तीतून निर्माण झालेला एक सुंदर कलाविष्कार आहे. प्राचीन कलेत अशा काल्पनिक किंवा पौराणिक प्राण्यांची विविधता फार मोठी आहे. ते प्राणी किती आहेत आणि कोणकोणते आहेत याची एक झलक बघायची म्हटली तर आपल्या समोर कलेचे एक मोठे दालनच उघडले जाते. ज्यात पंख असलेला सिंह, चोच असलेला सिंह, शिंग असलेला सिंह, किन्नर-किन्नरी, चेहरा माणसाचा आणि शरीर सिंहाचे किंवा हत्तीचे असा प्राणी, अर्धा माणूस आणि अर्धा घोडा, हत्तीचे तोंड असलेला माणूस, बकरीचे तोंड असलेला माणूस, सिंह-मगर-माशाची शेपूट असा संयुक्त प्राणी, पंख असलेले हरीण, पंख असलेला बैल, हत्तीचे तोंड आणि पंख असलेला बैल, पंख असलेली बकरी, गरुडाचे शरीर आणि पंख असलेला पुरुष किंवा स्त्री, नरसिंह आणि त्याला पंख, सिंह-मगर, हत्ती-मासा, हरणाला माशाची शेपूट, बकरीला माशाची शेपूट, हत्तीला विंचवाची शेपूट, सिंहाचे पंजे असलेला बैल आणि त्याला माशाची शेपूट, माशाची शेपूट असणारी जलपरी, घोडय़ाचे तोंड असलेला समुद्री मासा ज्याला हॉर्सफिश असे म्हणतात, पंख असलेली बकरी आणि तिला माशाची शेपूट असे अक्षरश अगणित व्याल प्रकार आपल्या प्राचीन हिंदुस्थानी कलेत दिसून येतात.

या काल्पनिक संमिश्र प्राण्यांबद्दल कलाकारांच्या मनात काय कमालीचे आकर्षण होते आणि त्याचबरोबर त्यांच्या कल्पनाशक्तीची झेप किती अफाट होती हे यावरून दिसून येते. कुठल्याही दोन भिन्न प्राण्यांच्या शरीराचे विशिष्ट भाग एकत्र करून एक नवीनच प्राणी सादर करायचा असा जणू छंदच त्यांना जडला होता. या संकल्पनेचे कलेमध्ये सादरीकरण करताना या कलाकारांची कल्पनाशक्ती किती अचाट होती याची जाणीव, हे सगळे व्याल बघताना आपल्याला प्रकर्षाने होते. हे सगळे इतक्या मोठय़ा संख्येने असलेले आणि विविध प्रकारचे प्राणी आपल्यासमोर सांगताना त्यांची वैशिष्टय़ानुसार निरनिराळ्या गटात विभागणी केली आहे. हे एवढे सगळे विविध प्रकार एकत्र करताना त्यांची काही वैशिष्टय़े लक्षात घेऊन ती इथे सादर केली आहेत. त्यांचे अवयव किंवा कुठल्या प्राण्याचे अवयव त्यांना जोडले आहेत हे विचारात घेऊन त्यांचे साधारण वर्गीकरण केले आहे. के. कृष्णमूर्तींनी त्यांच्या पुस्तकात हे इहामृग किंवा व्याल मांडताना ते साधारणत तीन प्रकारांत विभागले आहेत. आकाशगामी प्राणी (व्योमचरिन्), जमिनीवरचे प्राणी (भूचरिन्), आणि पाण्यातले प्राणी (जलचरिन्) असे हे तीन प्रकार होत. या प्राण्यांना दाखवलेल्या विशिष्ट अवयवांमुळे त्यांचे वर्गीकरण अशा तीन प्रकारांत केलेले आहे. यातले काही प्राणी दोन गटांतसुद्धा मोडतात. मूलत तो प्राणी कोण आहे आणि मग त्याला कुठले अवयव जोडले आहेत याचा विचार इथे केला आहे. मूलत तो प्राणी जर जमिनीवरचा असेल आणि त्याला पंख जोडले असतील तर त्याचा समावेश आकाशगामी प्राण्यात केला आहे. त्याचे बदललेले रूप कोणते आहे यावर तो कुठल्या गटात बसतो हे ठरवले आहे. या काही तांत्रिक बाबी जरी असल्या तरी यातली नाटय़मयता, त्या प्राण्यांचे नवीन तयार झालेले रूप, त्यातल्या काही प्राण्यांचे परकीय कलेशी असलेले साधर्म्य किंवा पूर्णपणे परदेशी कलेतच त्यांचा असलेला आढळ यांचा ऊहापोह त्या त्या वेळी केलेला आहे. के. कृष्णमूर्तींनी तर अनेक प्राण्यांच्या कथा, लोककथा यांचे खूप रंजक वर्णन केले आहे. यातल्या प्रत्येक प्रकारातील गमतीशीर प्राणी आपण इथे बघणार आहोत.

[email protected]