
श्रीलंकन फलंदाजांचा कर्दनकाळ ठरलेला सिराजने आपली ‘सामनावीर’ म्हणून मिळालेली बक्षिसाची रक्कम प्रेमदासाच्या ग्राऊंड्समनना अर्पण केली. त्यांच्या मेहनतीशिवाय आशिया चषक होऊच शकला नसता, असेही गौरवोद्गार सिराजने ग्राऊंड्समनप्रति काढले. एवढेच नव्हे तर आशियाई क्रिकेट परिषदेनही कोलंबोच्या ग्राऊंड्स स्टाफला 50 हजार डॉलर्सची रक्कम बक्षिसापोटी देत त्यांचे मनापासून आभार मानले आणि त्यांचे कौतुकही केले. सामना संपल्यानंतर खुद्द एसीसी अध्यक्ष जय शहा यांनी हा चेक त्यांना दिला.
असा विचारच केला नव्हता…
आजचा अंतिम सामना नेहमीच लक्षात ठेवला जाईल. आमच्या सर्वच खेळाडूंनी केलेली मेहनत फळली. आज चेंडू इतका वळेल, याचा आम्ही कधी विचारच केला नव्हता. ही आमच्या गोलंदाजांचीही कमाल आहे. अशी कामगिरी खूपच दुर्मिळ असते. असा खेळ क्वचितच होतो. आता आम्हाला वर्ल्ड कपपूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामने आणि दोन सराव सामने खेळायचे आहेत. संघ योग्य दिशेने जात असल्याचे कर्णधार रोहित शर्मा म्हणाला.