आशियाई अजिंक्यपद हॉकी – हिंदुस्थानचा ‘अव्वल’ नंबर; मलेशियाचा 5-0 ने फडशा पाडला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

यजमान हिंदुस्थानने आशियाई अजिंक्यपद हॉकी स्पर्धेत फॉर्मात असलेल्या मलेशियाचा 5-0 गोलफरकाने फडशा पाडला आणि गुणतालिकेत पुन्हा एकदा अव्वल नंबर मिळविला. मलेशियाने पहिल्या दोन्ही लढतीत दमदार विजय मिळवित अव्वल स्थान कायम राखले होते, मात्र आज हिंदुस्थानने पंचतारांकित विजयाची नोंद करत ते स्थान हिसकावून घेतले.

सेल्वम कार्थीने 15 व्या मिनिटाला सुरेख मैदानी गोल करीत हिंदुस्थानने खाते उघडले. त्यानंतर हार्दिक सिंगने 32 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल करीत हिंदुस्थानची आघाडी 2-0 ने वाढविली. हिंदुस्थानला 42 व्या मिनिटाला पुन्हा पेनल्टी मिळाली. हरमनप्रीत सिंगने या संधीचे गोलमध्ये रूपांतर करीत ही आघाडी 3-0 अशी आणखी भक्कम केली. मग गुरजंत सिंगने 53 व्या मिनिटाला मैदानी गोल करीत हिंदुस्थानला 4-0 असे आघाडीवर नेत आपल्या संघाचा विजय निश्चित केला. पुढच्याच मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर जुगराज सिंगने गोल करून हिंदुस्थानला 5-0 असा दणदणीत विजय मिळवून दिला.

चीनने गतविजेत्या कोरियाला बरोबरीत रोखले

चीनने गतविजेत्या दक्षिण कोरियाला 1-1 असे बरोबरीत रोखले. कर्णधार जोंगह्युन जांगने 18 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल करीत दक्षिण कोरियाचे खाते उघडले. चीनच्या चोंगकोंग चेन याने 43 व्या मिनिटाला गोल करीत आपल्या संघाला बरोबरी साधून दिली. त्यानंतर दोघांनाही दुसरा गोल करता आला नाही.

पाकिस्तान-जपान लढतीतही बरोबरी

जपानने पाकिस्तानला 3-3 असे बरोबरीत रोखण्याचा पराक्रम केला. पाकिस्तानकडून राणा अब्दुल (9), महम्मद खान (25 आणि 55) यांनी गोल केले. जपानकडून तनाका सेरेन (13), काटो रयोसीने (37) मैदानी गोल होते. त्यानंतर ओहाशी मसाकीने 45व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल केला.