महिला हॉकी संघाची विजयी घोडदौड कायम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन , आशिया  

हिंदुस्थानच्या महिला हॉकी संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेतील आपली विजयी घोडदौड कायम ठेवत गतविजेत्या थायलंडला 5-0 गोल फरकाने धूळ चारून ‘ब’ गटातून अव्वल स्थान राखले. कर्णधार राणी रामपालने या लढतीत गोलची हॅटट्रिक केली. याआधीच्या तिन्ही लढतींत राणी रामपालला गोल करता आला नव्हता.

हिंदुस्थानी महिला हॉकी संघाने आधीच विजयाच्या हॅटट्रिकसह उपांत्य फेरी गाठली होती. सोमवारी गट फेरीतील अखेरच्या चौथ्या लढतीत हिंदुस्थानला अन्य लढतींच्या तुलनेत थायलंडविरुद्ध विजयासाठी काही प्रमाणात संघर्ष करावा लागला. कारण थायलंडने हिंदुस्थानचे आक्रमण थोपवून पहिल्या दोन सत्रांत सामना गोलशून्य बरोबरीत राखून सुरेख खेळ केला. हिंदुस्थानला पाच कॉर्नर मिळाले, परंतु त्यावर त्यांना एकही गोल करता आला नाही.

हिंदुस्थानची कर्णधार राणी रामपालने तिसऱ्या क्वार्टरमध्ये 37व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल करून हिंदुस्थानचे खाते उघडले. त्यानंतर चौथ्या क्वार्टरच्या सुरुवातीला राणी रामपालनेच 46व्या मिनिटाला सुरेख मैदानी गोल करून हिंदुस्थानची आघाडी 2-0 अशी वाढविली, मात्र त्यासाठी हिंदुस्थानी खेळाडूंना 13 शॉटस् ऑन टार्गेट मारावे लागले. चौथ्या क्वार्टरच्या 13 व्या मिनिटाला सहाव्या कॉर्नरवर दीप ग्रेस एक्का हिचा शॉट थायलंडच्या गोलरक्षकाने अडवला, मात्र मोनिकाने लगेच त्याच चेंडूचे गोलमध्ये रूपांतर करून हिंदुस्थानची आघाडी 3-0 अशी आणखी भक्कम केली. लढतीच्या 54 व्या मिनिटाला नवज्योत कौरने सुरेख गोल करून हिंदुस्थानची आघाडी 4-0 ने वाढविली.  त्यात राणीने आणखी एका गोलची भर घालून हिंदुस्थानला 5-0 गोल फरकाने सामना जिंकून दिला. हिंदुस्थानच्या महिला हॉकी संघाने आशियाई स्पर्धेच्या इतिहासात सलग आठव्यांदा उपांत्य फेरी गाठली आहे. आता उपांत्य फेरीत हिंदुस्थानसमोर चीनचे आव्हान असेल