
हिंदुस्थानी खेळाडूंनी आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात यंदा प्रथमच पदकांचे शतक गाठून देशाच्या क्रीडा क्षेत्रात नवा अध्याय लिहिला. याआधी 2018 च्या आशियाई स्पर्धेतील 70 पदके ही हिंदुस्थानची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी होती. यंदाच्या आशियाई स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी करून ऐतिहासिक शतकोत्सव साजरा केला. शुक्रवारी हिंदुस्थानच्या खात्यात 86 पदके होती. शनिवारी हिंदुस्थानी खेळाडूंनी तिरंदाजी, कबड्डी, बॅडमिंटन, क्रिकेट, बुद्धिबळमध्ये पदके जिंकून पदकांची शंभरी पार केली. शनिवारी बुद्धिबळातील दोन रौप्यपदकांनी हिंदुस्थानची आशियाई स्पर्धेतील ऐतिहासिक मोहिमेची 107 पदकांवर सांगता झाली. यात 28 सुवर्ण, 34 रौप्य व 41 कांस्यपदकाचा समावेश होय.
क्रिकेटमध्ये पदार्पणात सोनेरी यश
आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या क्रिकेट स्पर्धेत हिंदुस्थानने सुवर्णपदक पटकावले. हिंदुस्थान-अफगाणिस्तान दरम्यानचा अंतिम सामना पावसामुळे शनिवारी रद्द झाला. पंचांनी आयसीसी टी-20 क्रमवारीच्या आधारे हिंदुस्थानला विजेता घोषित केले.
ओजसची ‘सुवर्ण’ हॅटट्रिक
हिंदुस्थानचा तिरंदाज ओजस देवतळेने आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकाची हॅटट्रिक केली. त्याने शनिवारी पुरुषांच्या वैयक्तिक कम्पाऊंड प्रकारात सुवर्णपदक जिंकले. ओजसने आर्चरी मिश्र टीम कम्पाऊंड प्रकारात सुवर्णपदक तर गुरुवारी आर्चरी मेन्स कम्पाऊंड टीम इव्हेंटमध्येही सुवर्णपदक मिळवले.
सात्त्विक–चिराग जोडीला ऐतिहासिक सुवर्ण
सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या हिंदुस्थानी जोडीने आशियाई क्रीडा स्पर्धेतील बॅडमिंटनच्या पुरुष दुहेरीत सुवर्णपदक जिंकून इतिहास घडविला. हिंदुस्थानी जोडीने अंतिम लढतीत चोई सोलग्यू व किम वोन्हो या कोरियन जोडीचा 21-18, 21-16 असा धुव्वा उडवला.
ज्योती सुरेखाला सुवर्ण, अदितीला कांस्य
ज्योती सुरेखाने तिरंदाजीतील कम्पाऊंड महिला वैयक्तिक प्रकारात सुवर्णपदक जिंकले. ज्योतीने दक्षिण कोरियाच्या सो चाएवोन हिचा 149-145 अशा गुणफरकाने पराभव केला. याच प्रकारात अदिती स्वामीला कांस्यपदक मिळाले.
बुद्धिबळात दोन रौप्यपदके
हिंदुस्थानच्या पुरुष व महिला बुद्धिबळ संघांनी रौप्यपदकाची कमाई केली. अंतिम फेरीत हरिका द्रोणावली, वैशाली रमेशबाबू, वनिता अगरवाल आणि सविता श्री भास्कर यांनी सामने जिंकून दक्षिण कोरियाचा पराभव 4 -0 असा केला होता.
कुस्तीपटू दीपक पूनियाला रौप्य
दीपक पूनियाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. इराणच्या हजान यजदानीपुढे दीपकचा निभाव लागला नाही.
महिला हॉकी संघाला कांस्य
हिंदुस्थानच्या महिला हॉकी संघाने शनिवारी कांस्यपदक जिंकले. हिंदुस्थानी महिलांनी कांस्यपदकाच्या लढतीत जपानचा 2-1 गोलफरकाने पराभव केला.
आशियाई क्रीडा स्पर्धेत हिंदुस्थानच्या स्क्वॉश चमूने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला धूळ चारून जेतेपद पटकावले. या हिंदुस्थानच्या चमूमध्ये योगीनगर परिसरात राहणारा महेश माणगावकर या खेळाडूचा समावेश होता. शिवसेना आमदार विलास पोतनीस यांनी महेशचा सत्कार केला. याप्रसंगी दयानंद माणगावकर, अंजली माणगावकर, उपविभागप्रमुख विनायक सामंत, योगिनी लाड, सुरेश लाड उपस्थित होते.
आशियाई पदक तालिका
देश सुवर्ण रौप्य कास्य एकूण
चीन 192 106 66 364
जपान 48 62 67 177
द.कोरिया 39 55 89 183
हिंदुस्थान 28 37 41 106




























































