विवाहितेला धुणी-भांडी करायला सांगणे क्रूरता नाही; हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विवाहितेला धुणी-भांडी करायला सांगणे ही कौटुंबिक हिंसाचार कायद्यांतर्गत क्रूरता ठरू शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा देत उच्च न्यायालयाने सासरच्यांविरोधातील गुन्हा रद्द केला.

पती एकदा मला नणंदेकडे घेऊन गेला होता. तेथे मला धुणी-भांडी करायला सांगितले. ही क्रूरता आहे, असा आरोप करत एका पत्नीने  सासू, सासरे, नणंद व दिराविरोधात कौटुंबिक हिंसाचारासह अन्य कलमांतर्गत पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी याचा गुन्हा नोंदवला. हा गुन्हा रद्द करण्यासाठी या सर्वांनी याचिका दाखल केली.

न्या. अभय मंत्री यांच्या एकल पीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. मला बाळ होत नसल्याने सासरचे मला सतत टोमणे मारायचे. पतीला घटस्पह्ट देण्यास ते वारंवार सांगत होते. हीदेखील क्रूरता आहे. तेव्हा हा गुन्हा रद्द करू नये, अशी विनंती महिलेने केली. मात्र आम्ही सुनेसोबत राहत नाही. तेव्हा तिने केलेले आरोप निराधार आहेत, असा दावा सासरच्यांनी केला. हा दावा न्यायालयाने ग्राह्य धरला. नणंदेच्या घरात विवाहितेला धुणी-भांडी करायला सांगितले गेले हे सत्य असले तरी काौटुंबिक हिंसाचार कायद्यांतर्गत ही क्रूरता ठरू शकत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

सत्यता तपासणे आवश्यक

विवाहितेने सोबत न राहणाऱ्या सासरच्या मंडळींवर आरोप केल्यास त्याची सत्यता काळजीपूर्वक तपासायला हवी. या प्रकरणातील सासू, सासरे, नणंद व दीर हे या विवाहितेसोबत राहत नव्हते. अशा परिस्थितीत त्यांच्याविरोधात कौटुंबिक हिंसाचाराचा खटला चालवणे कायद्याची अवहेलना ठरेल, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.