
आपचे नेते आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी आसाममधील भाजपचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. शर्मा हे कोरोना महामारीच्या काळात आरोग्यमंत्री होते तेव्हा त्यांनी टेंडर न काढताच पत्नीला पीपीई किटचे कंत्राट दिले, असा दावा सिसोदिया यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे शर्मा अडचणीत सापडले आहेत.
हेमंत शर्मा यांनी कोरोना महामारीचा गैरफायदा घेऊन पत्नीच्या माध्यमातून घोटाळा केल्याचे सिसोदिया यांनी म्हटले आहे. बाजारात पीपीई किटची किंमत 600 रुपये होती. पण शर्मा यांनी 990 रुपये दराने पत्नीच्या कंपनीला पीपीई किटचे कंत्राट दिले होते. याशिवाय मुलाच्या भागीदारांच्या कंपनीलाही कंत्राट देण्यात आले होते, असे आरोप सिसोदिया यांनी केल्यामुळे शर्मा यांच्या अडचणीत भर पडली आहे.
सत्येंद्र जैन यांच्यावरील सर्व आरोप खोटे
सिसोदिया यांनी हेमंत शर्मा यांच्या भ्रष्ट कारभाराची पोलखोल करतानाच दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांच्यावरील आरोपांचे खंडन केले. जैन यांच्यावर लावलेले आरोप खोटे आहेत. भाजपचे सर्व आरोप प्रत्येक पावलावर खोटे असल्याचे सिद्ध होतात. कारण त्यांचे नेते नेहमीच खोटे बोलतात, असे सिसोदिया म्हणाले.



























































