टीम इंडियाला मारण्याची धमकी, महाराष्ट्र एटीएसने तरुणाला केली अटक

501

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) आसाममधील एका तरुणाने हिंदुस्थानच्या क्रिकेट संघाला मारण्याची धमकी देणारा मेल पाठवला. याची माहिती बीसीसीआयने पोलिसांना दिल्यानंतर महाराष्ट्र एटीएसने आरोपीला आसाममधून अटक केली आहे. आसामच्या मोरेगाव जिल्ह्यातील धरमतूल येथील शांतीपूर भागातून तरुणाला अटक केली असून ब्रजमोहन दास असे तरुणाचे नाव आहे.

महाराष्ट्र एटीएस पथकाने आरोपी तरुणाला 20 ऑगस्टला अटक केली. अटकेनंतर तरुणाला मुंबईमध्ये आणण्यात आले आणि न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपी तरुणाला 26 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.  आरोपी तरुणावर कलम 506(2), 507 सह कलम 7 क्रिमीनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट 1932 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तसेच आरोपी तरुण मानसिक रुग्ण असल्याची माहिती मिळत आहे.

man-arrest

काय होते ई-मेलमध्ये?
हिंदुस्थानचा संघ वेस्ट इंडीज दौऱ्यावर आहे. याच दरम्यान बीसीसीआयला एक धमकीचा मेल मिळाला. आसाममधून पाठवण्यात आलेल्या या मेलमध्ये टीम इंडियाच्या खेळाडूंची हत्या करण्याची धमकी देण्यात आली होती. ‘विद्रोहींनी हिंदुस्थानमध्ये शरण घेतली आणि त्यांना मारले नाही तर आम्हाला टीम इंडियाच्या सर्व सदस्यांची हत्या करावे लागेल’, असा मेल बीसीसीआयला आला होता.

धमकीचा मेल मिळाल्यानंतर बीसीसीआयने मुंबई पोलिसात याप्रकरणी एफआयआर दाखल केली. यानंतर महाराष्ट्र एटीएसने आसाममधील जगीरोड पोलीस स्थानकाशी संपर्क साधून तरुणाचा पत्ता मिळवला. अटकेनंतर तरुणाला मोरेगाव येथील न्यायालयात हजर करण्यात आले. यानंतर त्याचा ताबा मुंबई पोलिसांना देण्यात आला आणि अधिक चौकशीसाठी त्याला मुंबईत आणण्यात आले. सध्या हा तरुण पोलीस कोठडीमध्ये असून पोलीस तपास सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या