
सातारा-लातूर राष्ट्रीय महामार्गावर कोरेगाव शहरात पंचायत समिती कार्यालयानजीक उसाच्या ट्रक्टर ट्रॉलीला ओव्हरटेक करताना समोरून येणाऱया ट्रकने दुचाकीला धडक दिली. या अपघातात तांदूळवाडी (ता. कोरेगाव) येथील दाम्पत्य जागीच ठार झाले. या घटनेची नोंद कोरेगाव पोलीस ठाण्यात झाली आहे.
बजरंग नारायण काटकर (वय 59) व पत्नी शोभा बजरंग काटकर (वय 55) असे अपघातात ठार झालेल्या वृद्ध दाम्पत्याचे नाव आहे.
सध्या गाळप हंगाम सुरू असून, सर्वच प्रमुख रस्त्यांवर ऊस वाहतूक सुरू आहे. कोरेगाव शहरातूनही मोठय़ा प्रमाणावर ट्रक्टर ट्रॉलीची वाहतूक होत आहे. सातारा-लातूर महामार्गावर काटकर दाम्पत्य गावाकडे निघाले होते. यावेळी त्यांची दुचाकी कोरेगाव पंचायत समितीनजीक आली असता, पुढे चाललेल्या ट्रॉलीला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न बजरंग काटकर यांनी केला. यावेळी समोरून आलेल्या मालट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकी ट्रकखाली 20 ते 25 फूट फरफटत गेली. यामध्ये काटकर दाम्पत्य जागीच ठार झाले. हा अपघात झाल्यानंतर बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. अपघातानंतर ट्रकचालक पसार झाला. पोलिसांनी संबंधित ट्रक पोलीस ठाण्यात आणण्यात आला आहे.
























































