
वयाच्या तिसऱ्य़ा वर्षापासून वडील नारायण जाधव यांच्या सान्निध्यात जलतरणाचे कसब आत्मसात करणाऱ्य़ा सुयश जाधव या मराठमोळ्या खेळाडूची या वर्षी अर्जुन पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर दैनिक ‘सामना’ने त्याच्याशी संवाद साधला. यावेळी त्याने कारकीर्दीला ज्या घटनेने कलाटणी मिळाली, तो क्षण ‘शेअर’ केला. तो म्हणाला, 2015 साली रशिया येथे पॅरा ऑलिम्पिक पात्रता फेरीचे आयोजन करण्यात आले होते. मी त्यामध्ये चांगली कामगिरी केली. रिओ पॅरा ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारा हिंदुस्थानचा मी पहिलाच जलतरणपटू ठरलो. त्यामुळे आनंद गगनात मावेनासा झाला होता. 2015च्या आधी एक साधा खेळाडू होतो. त्यानंतर कायापालट झाला, आत्मविश्वास वाढला. आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदक जिंकू लागलो, असे त्याने स्पष्टपणे सांगितले. दोन हातांनी अधू असलेल्या या पठ्ठय़ाची आतापर्यंतची जलतरणातील कामगिरी खरोखरच ‘काबिल-ए-तारीफ’ ठरलीय.
इलेक्ट्रिक तारेला चिकटल्यामुळे हात गमावले
मी कुटुंबासोबत सोलापूर येथील करमाळा येथे वास्तव्य करतो. चुलत भावाचे लग्न असतानाच माझ्या सोबत एक प्रसंग घडला. वयाच्या अकराव्या वर्षी खेळत असताना इलेक्ट्रिक तारेला चिकटल्यामुळे मला हात गमवावे लागले. त्यामधून बाहेर आलो. खेळासह एज्युकेशनवरही लक्ष केंद्रित केले. बीएपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले, असे सुयश जाधव पुढे म्हणतो.
आशियाई स्पर्धेत पटकावले ऐतिहासिक सुवर्ण
2009 साली मी पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झालो. बंगळुरू येथे झालेल्या स्पर्धेत मी कास्य पदक जिंकले. तसेच 2018 साली झालेल्या आशियाई स्पर्धेत जिंकलेले सुवर्ण पदक हे माझ्यासाठी संस्मरणीय ठरलेय. 50 मीटर बटरफ्लाय या प्रकारात मी हे पदक जिंकले. याआधी आशियाई स्पर्धेत हिंदुस्थानच्या एकाही खेळाडूला सुवर्ण पदक जिंकता आले नव्हते. त्यामुळे आपल्या देशासाठी हे पदक ऐतिहासिक ठरले. याच स्पर्धेत मी आणखी दोन पदके जिंकली. 2019 सालामध्ये दुबई येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तीन सुवर्ण, दोन रौप्य व एक कास्य पदक जिंकण्यात यश लाभले, असे सुयश जाधव पुढे
जलतरण ऍकॅडमी सुरू करायचीय
जलतरणपटू म्हणून कारकीर्द संपल्यानंतर याच खेळासाठी योगदान देण्याचे ठरवले आहे. महाराष्ट्रातून युवा खेळाडू घडावेत यासाठी जलतरण ऍकॅडमी सुरू करण्याचा प्रयत्न आहे, पण यासाठी आर्थिक मदतीची गरज भासणार आहे. महाराष्ट्र सरकार, कॉर्पोरेट सेक्टरच्या सहकार्याने ऍकॅडमीची पूर्तता होऊ शकते, असे सुयश जाधव यावेळी आवर्जून सांगतो.
पॅरालिम्पिक स्वीमिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे आभार
पॅरालिम्पिक स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे सेक्रेटरी व्ही. के. डबास यांच्याकडून मला अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्याची बातमी समजली. जलतरणासाठी केलेल्या कष्टाचे फळ मिळाल्याची भावना माझ्या मनामध्ये निर्माण झाली. कुटुंबातील सर्वच भावुक झाले. पॅरालिम्पिक स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडियाकडून माझ्या नावाची शिफारस करण्यात आली. त्यामुळे मला पुरस्कार मिळाला. त्यामुळे माझ्यासाठी हीच मोठी गोष्ट आहे, त्यांचा आभारी आहे, असे सांगणाऱ्य़ा सुयश जाधव याने लॉकडाऊनमध्ये रनिंग व फिटनेसचा सराव केल्याचेही नमूद केले.
वडीलच माझे प्रशिक्षक
वडील नारायण जाधव हे राष्ट्रीय जलतरणपटू आहेत. त्यामुळे माझी पावलेही या खेळाकडे वळली. तीन वर्षांचा असतानाच माझे पहिले पाऊल जलतरणाच्या दिशेने पडले. वडीलच माझे पहिले प्रशिक्षक आहेत. विहिरीत जलतरणाचा सराव केला. 2007 सालामध्ये राज्यस्तरावरील पहिली स्पर्धा खेळलो. यामध्ये तीन पदकेही जिंकली. तिथून सुरू झालेला प्रवास आजपर्यंत सुरू आहे, असे सुयश जाधव भावुकपणे सांगतो.
महान खेळाडू मायकेल फेल्प्स युवा खेळाडूंची प्रेरणा
जलतरण म्हटले तर इयान थॉर्प व मायकेल फेल्प्स ही नावे डोळ्यांसमोर येतात. इयान थॉर्पबद्दल खूप ऐकलेय. जलतरणातील महान खेळाडूंमध्ये त्यांचा समावेश केला जातो, पण प्रत्यक्षात त्याचा खेळ जास्त पाहता आला नाही, पण मायकेल फेल्प्सच्या सरावाचे, लढतींचे व्हिडीओ पाहिलेत. त्याच्यातील सातत्य, खेळावरील त्याचे प्रेम, खेळाकडे बघण्याचा त्याचा दृष्टिकोन, करीअरबाबत असलेले गांभीर्य हे सगळेच वाखाणण्याजोगे. जगभरातील असंख्य युवा खेळाडूंची तो प्रेरणा आहे, अशा शब्दांत सुयश जाधव याने मायकेल फेल्प्सचे कौतुक केले आहे.

























































