महागाई झुगारून लाडक्या बाप्पासाठी बाजारपेठा गजबजल्या

10

सामना प्रतिनिधी, मुंबई

महागाईने उच्चांक गाठला असला तरी चार दिवसांनी येणाऱ्या बाप्पांच्या स्वागतासाठी जोरदार खरेदी सुरू आहे. महागाई झुगारून नागरिकांनी गणपतीच्या खरेदीसाठी रविवारच्या सुट्टीचा मुहूर्त साधला होता. त्यामुळे दादर, क्रॉफर्ड मार्केट, भुलेश्वर, लालबागसह उपनगरांतील बाजारपेठांमध्ये तुफान गर्दी झाली होती.

मुंबई आणि कोकणातील गणेशोत्सवाला एक वेगळेच महत्त्व असते. मुंबईत आज अनेक सार्वजनिक गणपती मूर्तिशाळेतून वाजतगाजत आपल्या दरबारात रवाना झाले. दुसरीकडे घरगुती गणपतीसाठी बाजारपेठांमध्ये आज जोरदार खरेदी झाली. डेकोरेशनचे साहित्य, पूजेचे सामान खरेदी करण्यासाठी महत्त्वाच्या बाजारपेठा गर्दीने गजबजल्या होत्या. महागाई असली तरी ‘बाप्पा…या महागाईला आवर रे!’ असे साकडे घालत भाविकांनी खरेदी केली.

थर्माकोल बंदीमुळे इको-फ्रेंडली मखर, रंगीत पडदे आणि डेकोरेशनच्या अन्य साहित्याला मागणी वाढली होती. दादरमध्ये मोठ्या प्रमाणात मखर विकले गेले. कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांनी फोल्डिंगचे मखर प्राधान्याने खरेदी केले. दादरमध्ये खरेदीसाठी मुंबईच्या कानाकोपऱ्यातून लोक आले होते. रानडे रोड, आयडियलची गल्ली, फूलमार्केट परिसर गर्दीने फुलून गेला होता.

गणपतीच्या कंठय़ा, मोदक आदींसाठी लालबाग मार्केट प्रसिद्ध आहे. लालबागच्या चिवडा गल्लीमध्ये कडक बुंदीचे सव्वा किलो, पाच किलो, अकरा किलो असे विविध वजनाचे लाडू, मोदक घेण्यासाठी रांगा लागल्या होत्या. विशेषकरून हे लाडू, मोदक गणपतीसमोर नैवेद्य म्हणून ठेवले जातात. नंतर ते फोडून त्यांचा प्रसाद बनवला जातो. पूजेच्या साहित्याचीही लालबाग मार्केटमध्ये खास दुकाने आहेत. तिथेही खरेदीसाठी आज गर्दी होती.

डेकोरेशनचे साहित्य खरेदी करण्यासाठी हजारोंची गर्दी आज क्रॉफर्ड मार्केटकडे वळली होती. विविध प्रकारचे रंगीत पडदे, नक्षीदार पडदे यासाठी क्रॉफर्ड मार्केटची ग्राहकांनी खास निवड केली होती. सजावटीसाठी लागणारी चायनीज तोरणे, रंगीत बल्बचीही खरेदी मोठय़ा प्रमाणात झाली.

summary- atmosphere teemed for ganeshotsav

आपली प्रतिक्रिया द्या