मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला, काँग्रेसवर आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । भोपाळ

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या जन आशिर्वाद यात्रेदरम्यान दगडफेक करण्यात आली. यानंतर मुख्यमंत्री चौहान यांनी काँग्रेसला धारेवर धरले आहे. रविवारी 2 सप्टेंबरला सीधी जिल्ह्यात काही लोकांनी चौहान यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवत दगडफेक केली होती.

दगडफेकीनंतर शिवराज सिंह चौहान यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या हल्ल्यामागे काँग्रेसचा हात असून मध्यप्रदेशच्या राजकारणामध्ये यापूर्वी असे कधीही घडले नव्हते, असा आरोप शिवराज सिंह चौहान यांनी केला आहे. दोन्ही पक्षांच्या विचारांमध्ये संघर्ष सुरू होता, वेगवेगळ्या पार्टी आपला अजेंडा राबवत होती, परंतु असे कधीही झाले नव्हते, असे ते म्हणाले.

काँग्रेसला सवाल
शिवराज सिंह यांनी युपीए आणि काँग्रेसमधील अनेक दिग्गजांची नावे घेत त्यांना सवाल केला आहे. सोनिया गांधी, राहुल गांधी आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांना माझा खडा सवाल आहे की, काँग्रेस सध्या कोणती दिशा पकडून पुढे जात आहे? त्यांचे नेतृत्व आणि कार्यकर्ते जे करत आहे ते योग्य आहे का? असा सवाल चौहान यांनी सोनिया आणि राहुल गांधी यांच्यापुढे उपस्थित केला आहे.

दरम्यान, मध्यप्रदेशचे गृहमंत्री भूपेंद्र सिंह यांनी एएनआयशी बोलताना सांगितले की, ही घटना अतिशय दुर्भाग्यपूर्ण असून पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत 9 जणांना अटक करण्यात आली आहे. यात काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. सत्तेसाठी काँग्रेस कोणत्या स्तराला जात आहे याचे हे उत्तम उदाहरण आहे, असेही ते म्हणाले.