
मुळा धरण परिसरात दुचाकीला जिलेटीनच्या कांडय़ा जोडून शेतकऱयाला स्फोटाने उडविण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आल्याने राहुरी तालुक्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी राहुरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बाळासाहेब सहादू मंडलिक असे या शेतकऱयाचे नाव आहे. मंडलिक हे नेहमीप्रमाणे शेतात गेले होते. दुपारी घरी निघाले जात असताना, त्यांची गाडी अचानक बंद झाली. गाडी चालू करण्यासाठी गाडीखाली उतरून पाहणी करत असताना पेट्रोलच्या टाकीखाली जिलेटिनच्या दोन कांडय़ा व वायर गाडीच्या प्लगला जोडलेल्या दिसून आल्या. यासंबंधीची माहिती त्यांनी नातेवाईकांना दिली. मंडलिक यांनी जिलेटीन कांडय़ांना जोडलेल्या वायर तोडून टाकल्या. या घटनेबाबत मंडलिक यांनी बारागाव नांदूर येथील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शिवाजी पवार यांना माहिती दिल्याने घटनास्थळी पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलीस निरीक्षक प्रताप दराडे तसेच पोलीस पथकही घटनास्थळी दाखल झाले. संबंधित शेतकऱयाकडे असलेल्या कांडय़ा पोलीस खात्याकडे देण्यात आल्या असून, याप्रकरणी मंडलिक यांनी राहुरी पोलिसांत फिर्याद दिली होती.
मुळा धरणाच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर
मंडलिक हे धरणाच्या पुलावर होते. ही घटना घडली असती तर मोठा अनर्थ घडला असता. मंडलिक यांच्या शेतापासून मुळा धरण व भिंत हाकेच्या अंतरावर आहे. मुळा नदीपात्रात पाणी सोडलेले असल्याने शेतकरी मुळा धरणावरून ये-जा करतात. तसेच, धरण पाहण्यासाठी जिह्यातून मोठय़ा प्रमाणात पर्यटकदेखील येतात. हा प्रकार घडल्याने मुळा धरणाच्या संरक्षणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. अशा प्रकारच्या जिलेटिनमुळे या आधीही मुळा धरणात मासेमारी होत असल्याचे प्रकार घडले आहेत.

























































