औराद शहाजनी बाजार समितीच्या कारभारात अनागोंदी; संचालक मंडळानेच घेतल्या अनामत रक्कमा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लातूर जिल्ह्यातील औराद शहाजानी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कारभारात अनागोंदीपणा आढळला आहे. तब्बल 12 संचालकांनी अनामत रक्कमा उचलल्या होत्या. या संदर्भातील तक्रार करण्यात आल्यानंतर आता त्या रक्कमेच्या वसूलीसाठी संबंधित संचालकांना नोटीसा बजावण्यात आल्याची माहिती बाजार समितीच्यावतीने सहाय्यक उपनिबधंकांना देण्यात आलेली आहे.

औराद शहाजानी बाजार समितीच्या कारभारासंदर्भात मच्छिंद्र माधव कांबळे यांनी लेखी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीमध्ये त्यांनी बाजारसमितीच्या संचालकांनी, सचिवांनी पदाचा दुरुपयोग करुन अपहार केल्याचे म्हटले होते. या संदर्भात सहाय्यक निबंधकांनी बाजार समितीकडे लेखी खुलासा मागितला होता. बाजार समितीने दिलेल्या खुलाशामध्ये बाजार समितीच्या 12 संचालकांकडे अनामत रक्कमा असल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्या वसुलीसाठी नोटीस काढण्यात आल्याचेही खुलाशात म्हटले आहे.

सहाय्यक निबंधकांनी या संदर्भात दिलेल्या चौकशी अहवालात नमूद केले आहे की, बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या बैठका नियमीतपणे घेतल्या जात नाहीत. संचालक मंडळातील सदस्यांनी प्रवास व इतर कारणांसाठी अनावश्यक रक्कमा नियमबाह्यपणे उचल केल्या आहेत. तसेच एक वेळ उचल केलेली रक्कम परतफेड करण्याअगोदरच दुसरी उचल देण्यात आली आहे. बाजार समितीने शासनाची सुपरव्हिजन कॉस्ट, कर्मचाऱ्यांचे कर, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, अंशदान इत्यादींचा भरणा केलेला नाही. त्याचप्रमाणे कोणत्या आडते किंवा व्यापारी यांच्याकडून किती मार्केट फी येणे बाकी आहे, किती वसूली झाली आहे, या बाबतचे रेर्कार्डच उपलब्ध नसल्याचे दिसून आल्याचे नमूद केले आहे. या अनागोंदी कारभारासंदर्भात सहकारी विभागाचे अधिकारी काय कार्यवाही करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.