कोरोनाचे नियम मोडले, संचारबंदीतही सुरू ठेवले; संभाजीनगर शहरात 19 दुकानांना सील ठोकले

संभाजीनगर शहरात कोरोना नियमांचे उल्लंघन करीत संचारबंदीच्या काळातही दुकाने उघडी ठेवणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची कारवाई केली जात आहे. महापालिका आणि कामगार उपायुक्त कार्यालय यांच्या संयुक्त पथकाने आज शनिवारी गुन्हा दाखल झालेल्या 19 दुकानांना सील ठोकले. यामध्ये ऑनेस्टी, चांडक, गुडलक, लक्की डेकोरेटर्स या प्रमुख दुकानांचा समावेश आहे.

राज्य सरकारने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ब्रेक द चेन अंतर्गत नियमावाली जाहिर केली आहे. या नियमांची कठोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने नियमावली जाहिर केली असून अत्यावश्यक दुकाने वगळता इतर दुकाने बंद ठेवण्यात आदेश आहेत. तरी देखील शहरात कोरोना नियमांचे उल्लंघन करीत संचारबंदीच्या काळातही दुकानांचे शटर अर्धावर ठेवून कपडयांसह इतर साहित्याची विक्री करीत असल्याचे आढळून आल्यामुळे अशा दुकानदारांवर सिटीचौक आणि क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. गुन्हा दाखल झालेली दुकाने सील करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी मनपा आणि कामगार उपायुक्त कार्यालय यांना देण्यात आले.

मनपा-कामगार उपायुक्त कार्यालयाचे पथक

महापालिकेचे वॉर्ड अधिकारी प्रकाश आठवले यांच्या नेतृत्वाखाली पदनिर्देशक अधिकारी आर. एस. राचतवार, निरीक्षक सलमान काझी, वरिष्ठ लिपीक अलिम शेख, कनिष्ठ लिपीक सय्यद अफझल, स्वच्छता निरीक्षक सचिन मिसाळ, विशाल खरात, मनीष मिसाळ, किशोर नाडे यांच्यासह कामगार उपायुक्त कार्यालयाचे कामगार अधिकारी रोहन रूमाले, अमोल जाधव, दुकान निरीक्षक जी. ए. गावंडे, दुकाने निरीक्षक तथा सुविधाकार विठ्ठल वैद्य यांच्या संयुक्त पथकाने नागरिक मित्र पथकाच्या सहकार्याने सिटीचौक, वुंâभारवाडा, रंगारगल्ली, गुलमंडी, बसस्थानक या भागातील 19 दुकाने सील करण्याची कारवाई केली.

ऑनेस्टी, लक्की फ्लोरीस्ट, पंजाब ही दुकाने सील  

पैठणगेटवरील लक्की प्लेन्टस अ‍ॅड प्लोरीस्ट, गुडलक प्लोअर डेकोरेटर्स अ‍ॅड इव्हेन्ट यांच्यासह सिटीचौक मधील कपडयाचे ऑनेस्टी मॉड वेअर, अभय ड्रेसेस, रतनलाल मोतीलाल, करिष्मा क्लॉथ सेंटर, कृष्णा क्लॉथ, पंजाब शुटिंग शर्टिंग, शरद वॉच, गुलशान क्लॉथ, साबा कलेक्शन, झोरा क्लॉथ, आर. के. कलेक्शन, चांडक कृष्णा, फेमस ए-१ टेड्रर्स, सरल इलेक्ट्रिशन, रुख्मीणी साडी सेंटर, मनोकामना क्लॉथ सेंटर, मध्यवर्ती बसस्थानक समोरील युनुस टी हाऊस या 19 दुकानांना सील केले असून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशापर्यंत ही दुकाने बंद राहणार आहेत. यातील काही दुकानांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पैठणगेट, गुलमंडी, सिटीचौक रस्त्यावर शुकशुकाट

मनपा आणि कामगार उपायुक्त कार्यालयाच्या पथकाने दुकाने सील करण्याची कारवाई सुरू करताच पैठणगेट ते गुलमंडी दरम्यान दुकानसमोर रस्त्यावर उभे राहून वाहनधारकांसह पादचाऱ्यांना विनाकारण खरेदीसाठी दुकानात बोलावण्याऱ्या कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले. तसेच सिटीचौक ते शहागंज रस्त्यावर दुकानासमोर उभ्या राहणाऱ्या कर्मचाऱ्यांनी कारवाईच्या भितीने पलायन केले. त्यामुळे कारवाई होताच दुकानासमोर शुकशुकाट पहायला मिळाला.

आपली प्रतिक्रिया द्या