संभाजीनगर – माझे कुटुंब माझी जबाबदारी’ शिवसेना शपथ घेऊन मोहीम राबविणार

मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून कोरोना संसर्ग टाळण्यासाठी राबविण्यात येणारी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम जिल्ह्यात उद्या 1 ते 23 ऑक्टोबरदरम्यान हाती घेण्यात येणार असून, या मोहिमेत विविध उपक्रमांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

शिवसेनेच्या वतीने दरवर्षी सदस्य नोंदणी मोहीम राबविण्यात येते. यावर्षी कोरोना संसर्गामुळे मोहीम उशिरा सुरू केली असली तरी आतापर्यंत जिल्ह्यात शहरासह 90 ठिकाणी बैठका घेऊन सदस्य नोंदणीचा आढावा घेण्यात आला आहे. जवळपास एक लाख सदस्य नोंदणीचा संकल्प पूर्ण करण्यात येत आहे. कोरोना संसर्गामुळे सदस्य नोंदणीबरोबरच माझे कुटुंब माझी जबाबदारी या संकल्पनेतून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बूथनिहाय 50 वर्षे वयोगटातील सदस्य असलेल्या कुटुंबांचा सव्र्हे करून कोरोना संसर्ग टाळण्यासाठी उपाययोजनांची माहिती दिली. ही जबाबदारी पुढे तशीच सुरू ठेवण्यासाठी 1 ते 23 ऑक्टोबरदरम्यान विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.

केंद्रेकर यांच्यासह मान्यवरांची व्याख्याने
2 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.30 वाजता वॉर्ड व गावनिहाय कोरोनाचे संकट टाळण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने शपथग्रहणाचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. 4 ऑक्टोबर रोजी कोरोना टाळण्यासाठी करण्यात येणाNया उपाययोजनांबरोबरच कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्तीचे मनोधैर्य वाढविण्यासाठी ‘माझे कुटुंब माझे मनस्वास्थ्य’ या विषयावर डॉ. अपर्णा अष्टपुत्रे- शिसोदे यांचे आभासी व्याख्यान सायंकाळी 7 वाजता, त्यानंतर जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांचे ‘प्रशासन जबाबदारी व खबरदारी’ या विषयावर ऑनलाईन व्याख्यान होणार आहे. 5 ऑक्टोबर रोजी शहरातील विविध चौकात, प्रभागात व गावात विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांना मोफत मास्क वाटप करून कोरोना टाळण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. 8 ऑक्टोबर रोजी रिक्षाचालक, फेरीवाले यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी साबण भेट देण्यात येणार आहे. 11 ऑक्टोबर रोजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, सदस्य, नगरसेवक, शिवसेना पदाधिकारी हे विविध कुटुंबीयांना भेटी देऊन स्वच्छता, कोरोना टाळण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती देणार आहेत. त्याच दिवशी सायं. 7 वाजता जनता प्रशासन जबाबदारी व खबरदारी याबाबत विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर हे मार्गदर्शन करणार आहेत. 12 ऑक्टोबर रोजी कोरोना टाळण्यासाठी उपाययोजना म्हणून वापर करण्यात येणाNया वाफ घेण्याचे स्टीम वेपोरायजर भेट देण्यात येणार आहे. 15 ऑक्टोबर रोजी जागतिक अंध दिनानिमित्त अंध विद्यालयात मास्क, साबण आणि सॅनिटायजर भेट देण्यात येणार आहे. तसेच ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या विषयावर निबंध लेखन जागतिक विद्यार्थी दिनाचे औचित्य साधून घेण्यात येणार आहे. 18ऑक्टोबर रोजी नवरात्रीचे औचित्य साधून ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या विषयावर रांगोळी स्पर्धा घेण्यात येणार आहे. सायंकाळी 7 वाजता कोरोनाविषयी जनजागृती व आरोग्याची काळजी कशी घ्यावी याविषयी सिग्मा हॉस्पिटलचे संचालक डॉ. उन्मेश टाकळकर हे ऑनलाईन मार्गदर्शन करणार आहेत. 23 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 वाजता वॉर्ड, गावनिहाय शहर व ग्रामीण भाग मिळून जवळपास 11 हजार कोरोना योद्धा म्हणून काम करणाऱ्या नवदुर्गांचा सत्कार करण्यात येणार असल्याचे आमदार दानवे यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेस उपजिल्हाप्रमुख अनिल पोलकर, शहरप्रमुख विजय वाघचौरे, विश्वनाथ स्वामी, विकास जैन, डॉ. अण्णा शिंदे, तालुकाप्रमुख हनुमान भोंडवे, उपशहरप्रमुख राजेंद्र दानवे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

आपली प्रतिक्रिया द्या