पाच ग्राहकांना मिळणार दुकानामध्ये प्रवेश, तोंडाला मास्क नसल्यास दंड आकारणार

कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी मनपा प्रशासनाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. संभाजीनगर मनपा प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनी मंगल कार्यालयात 50 जणांना प्रवेश व मास्कचे बंधन घातले आहे. त्यापाठोपाठ गर्दी टाळण्यासाठी बाजारपेठेतील दुकानांमध्ये पाच ग्राहकांना प्रवेश मिळणार आहे. या ग्राहकांना मास्क असेल तरच दुकानामध्ये प्रवेश द्यावा अन्यथा दंड आकारून दुकान सील करण्याची कारवाई केली जाणार आहे. त्यासंबंधीचे लेखी आदेश वॉर्ड कार्यालयांना देण्यात आले असल्याची माहिती मनपाच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिली.

दिल्ली, गुजरात, गोवा, राजस्थान या चार राज्यांत कोरोनाची दुसरी लाट आली आहे. या लाटेने सर्वत्र थैमान घातले असले तरी महाराष्ट्रात अद्यापही दुसरी लाट आलेली नाही. दुसरी लाट रोखण्यासाठी राज्य सरकारने स्थानिक प्रशासनाला सतर्वâ राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार महापालिका प्रशासनाने कोरोनाची दुसरी लाट रोखण्याच्या दृष्टीने आतापासून उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. मनपा प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनी शहरातील वाढत्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मंगल कार्यालय चालकांनी बैठक घेतली. या बैठकीत मंगल कार्यालयात लग्न समारंभासह विविध कार्यक्रमांसाठी 50 व्यक्तींना प्रवेश द्यावा, प्रवेश देताना सर्वांना मास्कची सक्ती करण्यात यावी, विनामास्क प्रवेश दिला तर मंगल कार्यालय महिनाभरासाठी सील करण्याचा इशारा देण्यात आला.

तसेच बाजारपेठ, मोंढा, विविध दुकानात खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. ही गर्दी टाळण्यासाठी कठोर पावले उचलण्यात आली आहेत. पाच ग्राहकांना दुकानामध्ये प्रवेश देण्यात यावा. या ग्राहकांची खरेदी पूर्ण झाल्यावरच दुसऱ्या पाच ग्राहकांना प्रवेश दिला जावा. तसेच दुकानामध्ये प्रवेश करताना ग्राहकांना मास्कची सक्ती करण्यात यावी. मास्क न लावता दुकानामध्ये ग्राहक दिसून आले तर ग्राहकांना दंड करून पहिल्या वेळेस सात दिवसांसाठी दुकान सील केले जाईल, त्यानंतरही दुकानात विनामास्क ग्राहक आढळून आल्यास 15 दिवसांसाठी दुकानास सील ठोकले जाईल. दुकानासमोर थर्मल गन किंवा ऑक्सीमीटर ठेवावे, सॅनिटायझरची व्यवस्था करावी, सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळण्यात यावेत, यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी वॉर्ड कार्यालयांना देण्यात आली आहे. वॉर्ड कार्यालयांनी पथके स्थापन करून वेळोवेळी तपासणी करावी, नियमांचे पालन होत नसेल कारवाई करावी, असे लेखी आदेश मनपा प्रशासकांच्या स्वाक्षरीने काढण्यात आले असल्याचे डॉ. पाडळकर यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या