किंगस्टनवर विंडीज क्रिकेटचे दफन, ऑस्ट्रेलियाने अवघ्या 27 धावांत केले वस्त्रहरण; विजयाच्या हॅटट्रिकसह मालिकेत 3-0 असे यश

वेस्ट इंडीज संघाचे आणि वेस्ट इंडीज क्रिकेटचे ऑस्ट्रेलियाने पुन्हा एकदा भरमैदानात वस्त्रहरण केले. एकेकाळी कसोटी क्रिकेटचे किंग असलेल्या विंडीज संघाला किंगस्टनवर ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी 27 धावांत दफन करत त्यांच्या उरल्यासुरल्या क्रिकेटची लक्तरे काढली. तिसरी कसोटीही तिसऱयाच दिवशी संपणार हे निश्चित होते. ऑस्ट्रेलियाला 121 धावांत गुंडाळल्यानंतर वेस्ट इंडीजला 204 धावांचे लक्ष्य गाठून मालिकेचा शेवट सुखद करण्याची संधी होती. पण मिचेल स्टार्क आणि स्काॅट बोलॅण्डच्या भेदकतेपुढे विंडीजच्या फलंदाजांनी शरणागतीलाही लाजवेल असा लाजीरवाणा खेळ केला. 204 धावांचा पाठलाग करणारा विंडीज संघ अवघ्या 14.3 षटकांत 27 धावांवर जमीनदोस्त झाला आणि ऑस्ट्रेलियाने विजयाची हॅटट्रिक साजरी करताना तिसरी कसोटी 176 धावांनी जिंकत 3-0 असे निर्भेळ यशही मिळवले.

स्टार्कचे तिहेरी यश

पहिल्या डावात केवळ एक विकेट मिळवणाऱया मिचेल स्टार्कने डावाच्या पहिल्याच चेंडूवर जॉन कॅम्पबेलला बाद केले आणि त्यानंतर पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर केवलन अॅण्डरसन आणि ब्रॅण्डन किंग यांना पायचीत केले आणि एकाच षटकात तिन्ही आघाडीवीरांना शून्यावर बाद करण्याचा पराक्रम केला. त्यानंतर दुसऱ्या षटकात मिकायल लुईस आणि शाय होप यांना बाद करत विंडीजची 5 बाद 7 अशी दुर्दशा केली. 100 वी कसोटी खेळत असलेल्या स्टार्पने 9 धावांत सहा विकेट टिपण्याचा पराक्रम करत आपल्या 400 कसोटी बळींचा टप्पाही गाठला. तोच ‘सामनावीर’ आणि मालिकेत 46 धावा आणि 15 विकेट टिपत ‘मालिकावीर’ही ठरला.

बोलॅण्डची हॅटट्रिक

6 बाद 11 या स्थितीनंतर जस्टिन ग्रीव्ह्ज आणि अल्जारी जोसेफ यांनी 15 धावांची डावातील सर्वोच्च भागी रचली. मात्र तेव्हा बोलॅण्डने आपल्या दुसऱयाच षटकांत पहिल्या तीन चेंडूंवर ग्रीव्हज, शमार जोसेफ आणि जोमल वॅरिकन यांना बाद करत हॅटट्रिक साजरी केली. तो ऑस्ट्रेलियाचा दहावा हॅटट्रिकवीर ठरला. मग स्टार्पने जेडन सिल्सचा त्रिफळा उडवत विंडीजला 26 धावांतच संपवले.

विंडीजचा दारुण कामगिरीचा नीचांक

एकेकाळी कसोटी क्रिकेटचा वाघ असलेला पॅरेबियन संघाची आता मांजर झालीय. शंभरीत संघाचा खुर्दा पडणे हे त्यांच्यासाठी नित्याचेच झालेय. याच मैदानावर 2004 साली इंग्लंडने त्यांचा 47 धावांत फडशा पाडला होता तर 1999 मध्ये ऑस्ट्रेलियाने त्यांना 51 धावांत गुंडाळले तेव्हा ‘विंडीज क्रिकेटचे मरण’ या मथळय़ाखाली विंडीज संघावर टीका करण्यात आली होती. गेल्या तीन दशकांच्या कालखंडात विंडीजचा संघ तब्बल 12 वेळा शंभरीत गारद होण्याचे दुर्दैव सहन करावे लागले होते.

14.3 ः विंडीज संघाचा अवघ्या 14.3 षटकांत खुर्दा पाडला. ही कसोटी क्रिकेटमधील तिसरा सर्वात छोटा डाव ठरला आहे. 1924 साली दक्षिण आफ्रिकन संघाला इंग्लंडने 12.3 षटकांत गुंडाळले होते तर गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये लंकेचा डाव 13.5 षटकांत कोलमडला होता.

7 ः विंडीजचे सात फलंदाज शून्यावर बाद झाले. 148 वर्षांच्या कसोटी इतिहासात ही पहिलीच वेळ आहे. गेल्याच आठवडय़ात एजबॅस्टन कसोटीत इंग्लंडच्या 6 फलंदाजांना हिंदुस्थानने भोपळाही फोडू दिला नव्हता.

15 ः अवघ्या 15 चेंडूंत पाच विकेट टिपणारा मिचेल स्टार्प पहिलाच गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी एर्नी टोशाक यांनी हिंदुस्थानविरुद्धच्या 1947 च्या ब्रिस्बेन कसोटीत, स्टुअर्ट ब्रॉडने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2015 च्या नॉटिंगहॅम कसोटीत आणि स्काॅट बोलॅण्डने मेलबर्न कसोटीत इंग्लंडच्या पाच फलंदाजांना 19 चेंडूंत तंबूचा रस्ता दाखवला होता.

2 ः पहिल्याच षटकांत 3 विकेट टिपणारा स्टार्प दुसराच गोलंदाज. 2006 साली इरफान पठाणने कराची कसोटीत आपल्या पहिल्याच षटकांत हॅटट्रिक घेतली होती.

3 बाद 0 ः कसोटी इतिहास पहिले तिन्ही फलंदाज शून्यावर बाद होण्याची ही सहावी वेळ आहे. फक्त स्टार्पने हा करिश्मा पहिल्याच षटकांत करून दाखवला.

6 ः विंडीजच्या पहिल्या सहा फलंदाजांनी मिळून केवळ सहा धावा केल्या. ही कसोटी इतिहासातील सर्वात कमी धावसंख्या आहे. 1888 च्या सिडनी कसोटीत इंग्लंडविरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या सहा फलंदाजांनी मिळून 12 धावा केल्या होत्या. आज त्या दुर्दैवी विक्रमालाही विंडीजच्या फलंदाजांनी मागे टाकले.

विक्रमांच्या मैदानातून

  • 27 वेस्ट इंडीजचा कसोटी क्रिकेटमधील नीचांक. याआधी याच मैदानावर 2004 साली इंग्लंडने त्यांना 47 धावांत गुंडाळले होते. मात्र कसोटीतील 26 धावांचा नीचांक न्यूझीलंडच्या नावावर कायम राहिला.
  • 170 विंडीज संघाला दोन्ही डावांत 147 आणि 27 धावा मिळून 170 धावा केल्या. हा त्यांचा दोन्ही डावांचा मिळून नीचांक ठरला आहे. याआधी 1957 साली इंग्लंडविरुद्ध ओव्हल कसोटीत त्यांना 175 धावांत गुंडाळले होते.