कांगारूंच्या देशातील वणवा; कृषियुगाकडे परतण्याचा इशारा!

422

>> ऍड. गिरीश राऊत

पृथ्वीचे वाढलेलं तापमान या समस्येने सारं जग होरपळत आहे आणि या वाढीव तापमानाच्या समस्येचा फटका बसला तो ऑस्ट्रेलियाला. न्यू साऊथ वेल्स या ऑस्ट्रेलियाच्या राज्यातील जवळपास 40 हजार चौरस किलोमीटरचा टापू वणव्यांनी क्यापला. ऑस्ट्रेलियातील या खुरटय़ा जंगलात उन्हाळ्याच्या सुरुवातीला वणवे लागतातच. परंतु गेल्या तीन वर्षांत ऑस्ट्रेलियाच्या तापमानातील नवनवीन उच्चांक आणि पूर्वेकडील भागातील सलग तीन वर्षांचा दुष्काळ याचा परिपाक म्हणजे हे वणवे. न्यू साऊथ वेल्सच्या जंगलात लागलेल्या आगीमुळे जवळपास 48 कोटी प्राणी आणि पक्षी यांना जीव गमवावा लागला आहे. हे भस्मसात झालेलं विदीर्ण रूप म्हणजे निसर्गाने मारलेली कानशिलात आहे. म्हणूनच सृष्टी आणि मानव यांच्यातील परस्पर संबंध केंद्रस्थानी ठेवून आता तरी आपण शहाणे होणार का, हाच प्रश्न आहे.

ऑस्ट्रेलियात जंगले जळत आहेत. यावेळच्या वणव्यांमधे ताज्या माहितीप्रमाणे कोटय़वधी प्राणिमात्रांची आहुती पडली आहे. हजारो इमारती जळत आहेत. माणसे मरत आहेत, स्थलांतर करत आहेत. या जळत्या जंगलांची राख पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांत जात आहे. म्हणून शहरांनाही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होत आहे. तापमान जागोजागी 50 अंशावर जात आहे. विजेची उपकरणे काम करत नाहीत. शहरांचा वीजपुरवठा बंद पडत आहे. ही असाधारण परिस्थिती पृथ्वीच्या तापमानवाढीमुळे निर्माण झाली आहे. 1756 सालात जेम्स वॅटचे वाफेचे इंजिन अवतरले. सुमारे 300 कोटी वर्षांपासून पृथ्वीच्या पोटात असलेला कोळसा, तेल व वायुरूपात साठलेला कार्बन स्वयंचलित यंत्रांना ऊर्जा पुरवण्यासाठी मानवाने बाहेर काढून जाळला. वातावरणात गेलेल्या कार्बनने तापमानाच्या संदर्भात काळाचे चक्र उलट फिरवले. तापमानवाढीचे हे एक मुख्य कारण आहे.

याच औद्योगिकीकरणात वस्तुनिर्मिती, वीजनिर्मिती, सीमेंट, स्टील इ. बांधकाम साहित्य, वाहननिर्मिती, रासायनिक, यांत्रिक शेतीसाठी लागणारी रसायने आदींसाठी डोंगर त्यावरील जंगलांसह खणून काढले गेले. कार्बन शोषणारे हरितद्रव्याचे नैसर्गिक आविष्कार नष्ट करून शहरे उभी केली गेली. ठोक राष्ट्रीय उत्पादन वाढवणे म्हणजे प्रगती व विकास मानल्याने या प्रक्रियेत वातावरणातील कार्बनमध्ये सतत वाढ होत गेली व हरितद्रव्याचा नाश होत राहिला.

पॅरिस करारात मानवजात वाचवण्यासाठी आवश्यक सांगितलेली पृथ्वीच्या सरासरी तापमानातील 2 अंशाची निर्णायक वाढ चालू वर्षी होत आहे. सन 2016 पर्यंत 1.2 अंश वाढ झाली होती. तेंव्हापासून 0.20 अंशाची महाविस्फोटक वाढ सुरू झाली. 6 नोव्हेंबर 2017 ला जागतिक हवामान संघटनेने तापमानवाढ परिवर्तनीय झाल्याची म्हणजे तापमान वाढत राहणार असल्याची अधिकृत घोषणा जर्मनीतील ‘बॉन’ शहरात झालेल्या युनोच्या परिषदेत केली. खरे तर ही जगाला हादरवणारी व रूढ संकल्पना मोडून फेकण्यास सांगणारी घटना आहे. औद्योगिकरण चालू राहिल्यास मानवजात व जीवसृष्टी नष्ट होणार आहे, पण याची जाणीवही मानवजातीलाच नव्हे तर स्पेनची राजधानी माद्रिदमध्ये ‘कॉन्फरन्स ऑफ पार्टीज – 25’ या परिषदेसाठी जमलेल्या राष्ट्रांच्या प्रतिनिधींना असल्याचे जाणवले नाही.

सन 2018 मधील कार्बन डायऑक्साईडच्या उत्सर्जनात 85 टक्के वाटा वाहनांचा व वीजनिर्मितीसाठी कोळसा जाळण्याचा आहे. 9 टक्के वाटा सीमेंट निर्माणाचा आहे. या 94 टक्क्यांशिवाय उरलेले उत्सर्जन इतर वस्तुनिर्मितीचे आहे. हे उत्सर्जन शून्य करण्याची गरज असताना प्रत्येक गुंतवणूक प्रचंड वाढवण्याचे सरकारी धोरण राज्य आणि केंद्र सरकारांचे आहे. आता औद्योगिक युगातील ‘मेक इन………..’, ‘…….. इज अंडर कन्स्ट्रक्शन’ आणि ‘स्टार्ट अप’ अशा कल्पनांना सोडचिठ्ठी देण्यात यावी. पृथ्वी फक्त जीवन देण्यासाठी आहे, नोकरी देण्यासाठी नाही ही गोष्ट याक्षणी समजली नाही तर लवकरच पृथ्वी जीवन देण्यासाठी होती अशी स्थिती येईल व हे सांगायला आणि ऐकायला कुणी नसेल.

ही पृथ्वीवरील जीवसृष्टीच्या अस्तित्वासाठी आणीबाणी आहे. जगभर मोटारीचा त्याग करण्याची गरज आहे. कारण मोटारीचा उत्सर्जनात 40 टक्के प्रत्यक्ष व मोटारीसाठी होणारे रस्ते निर्माण व खुद्द मोटार निर्मितीसह सुमारे 75 टक्के वाटा आहे. मोटार ही शवपेटी आहे असे म्हणण्यात कोणतीही अतिशयोक्ती नाही. वीज व सीमेंटबाबतही हेच आहे. ‘विकास’ हा नैतिक, आध्यात्मिक, भावनिक, मानसिक, बौद्धिक असू शकतो, पण भौतिक नाही. प्रेम, विश्वास, ज्ञान, सत्य, तत्त्व व त्यांच्यावरील श्रद्धा यांच्या अभावामुळे भौतिक वस्तूंची आसक्ती तयार होते.

भौतिक दृष्टीने विकसित होण्याच्या कल्पनेने हे जग पछाडले आहे. शिक्षणामुळे सर्वांना नोकऱया हव्या आहेत, पण पृथ्वी त्याला मान्यता देत नाही याचे कुणाला भान नाही. पृथ्वीला, जीवनाला व सृष्टी आणि मानव यांच्यातील परस्पर संबंधाला केंद्रस्थानी ठेवून विचार करण्याची तत्काळ गरज आहे. कारण तोच खरा विचार असू शकतो.

औद्योगिक युगातील एका कप्प्यात स्वतःला बंदिस्त (कम्पार्टमेंटलाइज्ड थिंकिंग) करून विचार करणे तातडीने थांबवले पाहिजे. येथे भांडवलशाही, समाजवादी की साम्यवादी विचारसरणी हा प्रश्न नाही. हा त्यापलीकडचा प्रश्न आहे. येथे जे जे भांडवल स्वयंचलित यंत्र, रासायनिक पदार्थ निर्माण, कार्बन उत्सर्जन करते व हरितद्रव्याचा नाश करते, पृथ्वीची मूळ बैठक मोडते ते ते चुकीचे ठरते. भांडवल- पैसा, स्वयंचलित यंत्र यांना पृथ्वीवर कोटय़वधी वर्षे स्थान नव्हते व तेच योग्य होते.

गेल्या काही हजार वर्षांच्या काळात मानवी जीवनात अनेक कार्यक्षेत्रे निर्माण झाली. आज मानवजातीचे व जीवसृष्टीचे उच्चाटन होत असताना माणसे बधिरपणे ‘हा आमचा विषय नाही, हे आमचे क्षेत्र नाही’ असे म्हणताना दिसतात. औद्योगिकीकरणाने माणसाला किती संवेदनाहीन व अलिप्त, उदासीन बनवले आहे हे पाहिले की, धक्का बसतो व जाणवते की, स्वयंचलित यंत्र, औद्योगिकीकरण व शहरीकरण हा शाप आहे.

जिवंत राहण्यासाठी प्रयत्न करणे हा यांचा विषय नाही. तो कुणीतरी करेल असे यांना वाटते. ही मठ्ठपणा किंवा स्वार्थीपणाची हद्द आहे. मग निःस्वार्थीपणातून व त्यागातून आलेल्या विज्ञानाचा जयजयकार तरी करू नका. विज्ञानाचे मानवजातीच्या सुखाचा दावा करून आलेले उपयोजित रूप म्हणजे ‘तंत्रज्ञान’. हे जग तंत्रज्ञानात गुंग होऊन विज्ञानाला अव्हेरत, फेटाळत आहे. ही निर्वाणीची वेळ आहे. औद्योगिकीकरणापासून परतीच्या वाटेची व रक्षणाची संधी असलेले, 5 ते 10 हजार वर्षांच्या ऊर्जाविरहित कृषियुगाकडे परत वळण्याचे हे शेवटचे वर्ष आहे.

आपली प्रतिक्रिया द्या