
एखाद्याला लाखोची लॉटरी लागते तेव्हा त्या रकमेतून स्वतःसाठी काय खरेदी करायची, याचा विचार सर्वात आधी केला जातो. ऑस्ट्रेलियाचे पीटर चार्लटन याबाबत अपवाद ठरले. त्यांनी लॉटरीत पाच कोटी रुपये जिंकले, मात्र यातील एकही रुपया त्यांनी स्वतःसाठी खर्च केला नाही. चार्लटन यांनी लॉटरीतून मिळालेले सर्व पैसे गरजू मित्रांना, अनोळखी लोकांना आणि कोरोनामुळे आर्थिक स्थिती ढासळलेल्या लोकांना वाटले.
पीटरला लॉटरीतून जिंकलेली रक्कम स्वतःसाठी वापरणे योग्य वाटत नव्हते. त्यांनी गरजूंना हे पैसे वाटण्याचा निर्णय घेतला. लॉटरी लागल्यावर आपण एका खजिन्यावर बसलोय आणि आपल्याला यापासून मुक्तता हवी आहे, असे त्यांना वाटू लागले. त्यांनी कुटुंबियातील काही सदस्यांच्या आणि मित्रांच्या बँक खात्यात पैसे टाकले. आर्थिक परिस्थिती ठीक नसलेल्या गरजूंना पैसे देण्यासाठी त्यांनी मेसेज पाठवले. सुरुवातीला हे खोटे मेसेज असल्याचे लोकांना वाटले. यानंतर त्यांनी गरजूंना पैशाचे वाटप करत मदत करण्यास सुरुवात केली. या कामातून समाधान मिळत असल्याचे चार्लटन यांनी सांगितले.

























































