
तब्बल 70 टक्के चेंडूवर नियंत्रण ठेवूनही डेन्मार्कला सामन्याच्या निकालावर नियंत्रण ठेवता आले नाही आणि 60 व्या मिनिटाला गोल नोंदविणाऱया ऑस्ट्रेलियाने अत्यंत चुरशीच्या लढतीत बाजी मारली. त्यांनी मॅथ्यू लेकीच्या एकमेव गोलाच्या बळावर 16 वर्षांनंतर फिफा वर्ल्ड कपच्या अंतिम सोळात विजयाचे ठसे उमटविले. आता बाद फेरीत त्यांची गाठ ‘सी’ गटातील अव्वल संघाशी येत्या 4 डिसेंबरला पडेल.
आज अंतिम सोळात स्थान मिळविण्यासाठी ऑस्ट्रेलिया आणि डेन्मार्क एकमेकांच्या गोल क्षेत्रावर हल्ला चढवतील, हे अपेक्षित होतेच. डेन्मार्कने पहिल्या मिनिटापासून ऑस्ट्रेलियन क्षेत्रात जोरदार खेळ केला. जास्तीत जास्त चेंडूवर डेन्मार्कचेच नियंत्रण होते. त्यांचे फॉरवर्ड ख्रिस्टन्सन, ऍण्डरसन, निसेन ऑस्ट्रेलियन बचावफळीवर तुटून पडत होते, पण त्यांना ऑस्ट्रेलियन गोलक्षेत्रातील पासेसना गोल टच देता येत नव्हता.
पहिल्या हाफमध्ये डेन्मार्कचाच खेळ सरस होता, तरीही खेळ गोलशून्य बरोबरीतच थांबला. दुसऱया हाफमध्येही तोच ट्रेंड चालू होता. पूर्ण खेळावर डेन्मार्कचाच ताबा होता. ऑस्ट्रेलियाच्या दुप्पट पासेसही त्यांचे होते. खेळतही तेच होते. तरीही 60 व्या मिनिटाला मॅथ्यू लेकीने केलेल्या भन्नाट गोलाने पूर्ण सामन्याचे रूपच पालटवले. डेन्मार्कच्या बचावफळीला चकवत मॅथ्यूने केलेला गोल अद्भुत होता. हाच गोल निर्णायक ठरला. ऑस्ट्रेलियाला 16 वर्षांनंतर वर्ल्ड कपच्या उपउपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवून देणारा ठरला.
अमेरिकेची सरशी, इराण अपयशी
कतारपाठोपाठ इराणचेही स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. 1978 पासून फिफा वर्ल्ड कप खेळत असलेला इराणचा संघ आपल्या सहाही स्पर्धांमध्ये साखळीतच गारद झाला आहे. यावेळी प्रथमच इराणला बाद फेरीत धडक मारण्याची सुवर्णसंधी होती, पण अमेरिकेने त्यांना 1-0 ने पराभूत केले आणि फिफा वर्ल्ड कपच्या ‘बी’ गटातून आठ वर्षांनंतर बाद फेरी गाठली. आता अमेरिका ‘अ’ गटाच्या विजेत्या नेदरलॅण्ड्सशी दोन हात करील.
पहिल्या सत्रात अमेरिकेने इराणपेक्षा वरचढ खेळ केला. त्याने अनेकदा गोलची संधी निर्माण केली, पण ती हुकत होती. अखेर 38 व्या मिनिटाला स्टार मध्यरक्षक ख्रिस्तीयन पुलीसिचने सर्जिनो डेस्ट दिलेल्या पासला गोलपोस्टमध्ये मारण्याची करामत केली. पहिल्या सत्राच्या 7 मिनिटांच्या अतिरिक्त खेळात टीम विहने गोल ठोकला होता, पण रेफ्रीजनी त्या गोलला ऑफसाइड घोषित केले आणि अमेरिकेला 1-0 वरच समाधान मानावे लागले. इराणने दुसऱया सत्रात गोल करण्याचे अनेक प्रयत्न केले, पण ते आपल्या चेंडूला गोलपोस्टपर्यंत घेऊन जाण्यात नेहमीच अपयशी ठरले.
वेल्सडन इंग्लंड
पहिल्या 50 मिनिटांच्या खेळात एकही गोल न झाल्यामुळे सारेच चिंतीत होते. बाद फेरीत पोहोचण्यासाठी दोघांना विजय अनिवार्य होता. तेव्हाच इंग्लंडने वेल्सवर एका मागोमाग ट्रिपल धमाका करीत 3-0 अशा दणदणीत विजयासह फिफा वर्ल्ड कपच्या ‘बी’ गटातून अंतिम 16 संघांमध्ये सलग दुसऱयांदा आपले स्थान निश्चित केले, तर तब्बल 64 वर्षांनंतर फिफा वर्ल्ड कपमध्ये खेळत असलेल्या वेल्सचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. आता उपउपांत्य फेरीत धडक मारण्यासाठी इंग्लंडला सेनेगलशी भिडावे लागणार आहे.
ई, एफ गटात बाद फेरीसाठी चुरस
फिफा वर्ल्ड कपमध्ये आता गट फेरीचा उत्तरार्ध सुरू आहे. उद्या, 1 डिसेंबरला ‘ई’ व ‘एफ’ गटातील अखेरच्या गट लढती रंगणार आहेत. ‘ई’ गटातून स्पेन, जपान, कोस्टा रिका, तर ‘एफ’ गटातून क्रोएशिया, मोरोक्को व बेल्जियम या संघांना अंतिम 16 मध्ये स्थान मिळविण्यासाठी म्हणजेच बाद फेरी गाठण्यासाठी विजयाची गरज आहे. त्यामुळे या दोन्ही गटांत बाद फेरीसाठी चुरस रंगणार आहे.
‘एफ’ गटात गुरुवारी क्रोएशिया व बेल्जियम, दुसरीकडे कॅनडा व मोरोक्को यांच्यात लढती रंगणार आहेत. यात लागोपाठच्या दोन पराभवांमुळे कॅनडाचे स्पर्धेतील आव्हान आधीच संपुष्टात आले आहे, मात्र हा संघ विजयाचे खाते उघडून मोरोक्कोला स्पर्धेतून बाहेर करण्यासाठी सर्वस्व पणाला लावताना दिसेल. मोरोक्कोने सलामीच्या लढतीत क्रोएशियाला गोलशून्य बरोबरीत रोखले, तर दुसऱया लढतीत बेल्जियमचा 2-0 गोलफरकाने धुव्वा उडवून स्पर्धेतील आव्हान राखले होते. क्रोएशिया-बेल्जियम यांच्यातील विजेता बाद फेरीत wपोहचेल. ‘ई’ गटातून जपान-स्पेन आणि कोस्टा रिका-जर्मनी हे संघ उद्या एकमेकांना भिडणार आहेत. या गटातही लागोपाठच्या दोन पराभवांमुळे जर्मनीचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले असून उर्वरित तीन संघांना बाद फेरी गाठण्यासाठी विजयाची गरज आहे.