
पुन्हा एकदा अडीच दिवसांची हारकथा क्रिकेटप्रेमींनी अनुभवली. फक्त यावेळी पराभवाची माळ हिंदुस्थानी संघाच्या गळय़ात पडली. इंदूरच्या होळकर मैदानात हिंदुस्थानी संघ विजयापासून दूर राहिला. सलग दोन कसोटी सामन्यांत दारुण पराभव पत्करणाऱया ऑस्ट्रेलियाने तिसऱया कसोटीत हिंदुस्थानचाही अडीच दिवसांत फडशा पाडत आपल्या जखमांवर फुंकर मारली. ऑस्ट्रेलियाने विजयाचे 76 धावांचे लक्ष्य 18.5 षटकांतच अवघी एक विकेट गमावत गाठले. आता ऑस्ट्रेलिया चार सामन्यांच्या मालिकेत 1-2 ने पिछाडीवर आहे.
होळकर स्टेडियमवर हिंदुस्थान संघ एकही कसोटी हरला नव्हता. आज ऑस्ट्रेलियाने ती मालिका खंडित केली. रोहित शर्माही कर्णधार म्हणून प्रथमच कसोटी हरला. याआधी त्याच्या नेतृत्वाखाली चार कसोटी सामन्यांत दणदणीत विजयाची नोंद केली होती.
संघाच्या द्विशतकापासून चारही डाव वंचित
या कसोटीत एकाही डावात संघाला धावांचे द्विशतक गाठता आले नाही. हिंदुस्थानचा पहिला डाव 109 धावांत कोसळला तर ऑस्ट्रेलियन डावालाही 197 धावांच्या पुढे जाता आले नाही. त्यानंतर हिंदुस्थानचा संघ दुसऱया डावातही 163 धावांवरच गडगडला. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने 88 धावांची आघाडी असल्यामुळे त्यांना विजयासाठी केवळ 76 धावाच करायच्या होत्या आणि त्यांनी ते सहज केल्या.
ऑस्ट्रेलिया अंतिम फेरीत
पहिल्या दोन्ही कसोटींतील पराभवामुळे संकटात सापडलेल्या ऑस्ट्रेलियाने हिंदुस्थानला नमवित सर्वप्रथम जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यात आपले स्थान निश्चित केले. जर चौथा कसोटी सामना हिंदुस्थान जिंकतो तर लंडनला पोहोचणारा दुसरा संघ हिंदुस्थानचाच असेल. पण यासाठी हिंदुस्थानला आता आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. येत्या 7 ते 11 जूनला ओव्हलवर अंतिम लढत रंगेल.
दुसऱया डावात फिरकी अपयशी
गेल्या तिन्ही डावांत फिरकीचा करिश्मा पाहायला मिळाला. 30 पैकी 25 फलंदाज फिरकीने गुंडाळले होते आणि वेगवान गोलंदाजांना केवळ चारच विकेट मिळविता आल्या होत्या. एक फलंदाज धावबाद झाला होता. पण ऑस्ट्रेलियाच्या दुसऱया डावात हिंदुस्थानी अश्विन, जाडेजा आणि अक्षर या तिन्ही फिरकीवीरांच्या फिरकीची कमाल दिसली नाही.
अश्विनची सनसनाटी सुरुवात
76 धावांचे आव्हान खूपच तुटपुंजे होते. त्यामुळे हिंदुस्थान जिंकण्याची कुणालाही शाश्वती नव्हती. त्यातच अश्विनने डावाच्या दुसऱयाच चेंडूवर उस्मान ख्वाजाला भरतच्या हाती झेल देण्यास भाग पाडले आणि सनसनाटी सुरुवात केली. ऑस्ट्रेलियाचा ख्वाजा भोपळा न पह्डताच बाद झाल्यामुळे हिंदुस्थानी संघात चैतन्य संचारले, पण त्यानंतर ट्रव्हिस हेडने धडाकेबाज फलंदाजी करत हिंदुस्थानच्या विजयाच्या आशा धुळीस मिळविल्या. हेडने मार्नस लाबुशेनबरोबर 78 धावांची अभेद्य भागी रचत ऑस्ट्रेलियाला तब्बल सहा वर्षांनंतर हिंदुस्थानात पहिला कसोटी विजय मिळवून दिला.




























































