
ऑस्ट्रेलिया ओपन ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेची घमासान सुरू झाली. या स्पर्धेतील पहिल्याच फेरीत रशिया-युक्रेनदरम्यान सुरू असलेल्या युद्धाचे पडसाद बघायला मिळाले. युक्रेन आणि रशियन खेळाडू आमने-सामने आल्याने हा वाद उफाळून आला. उभय खेळाडूंच्या पाठीराख्यांमधील वादात आयोजकांना उडी घ्यावी लागली. त्यांनी तडकाफडकी रशिया आणि युक्रेनचे राष्ट्रध्वज स्टेडियमवर आणण्यास बंदी घातली.
रशिया व बेलारूस या देशातील खेळाडू तटस्थ ध्वजाखाली यंदाच्या ऑस्ट्रेलिया ओपन ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेत सहभागी झाले आहेत. मात्र या देशांतील खेळाडूंच्या पाठीराख्यांना स्टेडियमवर आपल्या देशाचे ध्वज घेऊन येण्यास आयोजकांनी परवानगी दिली होती. सोमवारी स्टेडियमवर रशियाचे दोन ध्वज दिसले. मंगळवारी युक्रेनची केटेरिना बॅण्डल व रशियाची कमिला रखिमोवा यांच्यात महिला एकेरीची लढत झाली. या लढतीदरम्यान रशियन चाहते आपल्या देशाचा ध्वज घेऊन आल्याने युक्रेनचे चाहते नाराज झाले. त्यांनी सुरक्षारक्षक व पोलिसांना स्टॅण्डमध्ये बोलावले. या घटनेनंतर युक्रेनच्या राजदूतांनी तक्रार केली. त्यामुळे टेनिस ऑस्ट्रेलियाने रशिया व बेलारूसचे ध्वज स्टेडियममध्ये आणण्यास बंदी घालण्याचा निर्णय घेतला. खेळाडू, टेनिसप्रेमी यांच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, युक्रेनच्या केटेरिनाने रशियाच्या कमिलावर 7-5, 6-7, 6-1 असा विजय मिळविला. ही चुरशीची लढत 2 तास 52 मिनिटांपर्यंत रंगली. रशिया व युक्रेन यांच्यात जवळपास 11 महिन्यांपासून युद्ध सुरू आहे. या युद्धाचा क्रीडा क्षेत्रावरही मोठा परिणाम झाला आहे. ‘फिफा’ने देखील युक्रेनवर युद्ध लादणाऱया रशियावर बंदी घातली आहे.
ऍण्डी मरेचा सलामीलाच घामटा
ऑस्ट्रेलिया ओपन टेनिस स्पर्धेत मंगळवारी ब्रिटनचा आघाडीचा टेनिसपटू ऍण्डी मरेला सलामीच्या लढतीत इटलीच्या मॅटिओ बेरेटिनीने पाच सेटपर्यंत झुंजविले. शेवटी 4 तास 49 मिनिटांपर्यंत रंगलेल्या या लढतीत मरेने मॅटिओचा प्रतिकार 6-3, 6-3, 4-6, 6-7(7/9), 7-6(10/6) असा मोडून काढला. महिला एकेरीत पाचव्या मानांकित बेलारूसच्या एरिना सबलेंकाने झेक प्रजासत्ताकच्या टेरेझा मार्टिनकोवाचा 6-1, 6-4 असा सरळ सेटमध्ये पराभव करून आपल्या अभियानास प्रारंभ केला. चतुर्थ मानांकित फ्रान्सच्या कॅरोलिन गार्सियाने कॅनडाच्या कॅथरीन सेबोव्हचा 6-3, 6-0 असा पराभव करीत दुसऱया फेरीत प्रवेश केला. द्वितीय मानांकित टय़ुनिशियाच्या वन्स जबूरेला कतारच्या तमारा जिदान्सेकला हरविण्यासाठी 7-6(10/8), 4-6, 6-1 असा घाम गाळावा लागला. पाचव्या मानांकित सर्बियाच्या नोवाक जोकोविचने स्पेनच्या रॉबर्ट बिनाचा 6-3, 6-4, 6-0 असा पाडाव करीत विजयारंभ केला.





























































