
<< स्वप्नाली अभंग
[email protected]
मुंबईतल्या आय.ई.एस कॉलेज ऑफ आर्किटेक्चर या महाविद्यालयातून प्रतीक धानमेरने वास्तुविशारद ही पदवी घेतली आहे. या अभ्यासक्रमादरम्यान काँक्रिटमध्ये बांधली जाणारी पक्की घरे पर्यावरणपूरक आणि आरोग्यदायी नाहीत हे प्रतीकच्या लक्षात आले. युनाटेड नेशन एन्व्हायर्नमेंट प्रोग्राम या संस्थेने जाहीर केलेल्या एका आकडेवारीत 38 टक्के प्रदूषण हे केवळ बांधकाम उद्योगामुळे होते. एक किलो सिमेंट तयार करत असताना 800 ग्रॅम कार्बनडायऑक्साईड हवेत सोडला जातो. बांधकाम उद्योग हा जास्त प्रदूषण निर्माण करणारा उद्योग आहे. त्यामुळेच या प्रदूषणात आणखी भर न घालता वेगळी वाट निवडण्याचा निर्णय प्रतीकने घेतला. आसपास उपलब्ध असलेल्या नैसर्गिक घटकांचा वापर करून घरे बांधण्याचा निग्रह प्रतीकने केला. या कामात त्याचे मित्र शार्दुल आणि विनिताही त्याच्याशी जोडले गेले.
2013 साली याची सुरुवात प्रतीकने तो राहत असलेल्या पालघर जिह्यातल्या मुरबाड या आदिवासी गावापासून केली. तिथल्या आदिवासी घरांची निसर्गाबरोबर कशी सांगड घातली आहे, याचा अभ्यास त्यांनी करायला सुरुवात केली आणि मग या विचारातूनच या तिघांनी पर्यावरणपूरक घराची मुहूर्तमेढ रोवली ती प्रतीकच्या स्वतःच्या घरापासून. या घराचा पाया भरताना तिथल्या मिस्त्रींनी घराचा पाया जर दगड आणि मातीत भरला तर पहिल्याच पावसात घर पडेल असे वारंवार प्रतीकला सांगितले, परंतु प्रतीकने अट्टहासाने घराचा पाया दगड व मातीत बांधला. 2016 च्या दरम्यान आधुनिक सोयींनी सुसज्ज मातीचे घराच्या बांधकाम पूर्ण झाले. त्यानंतरच्या येणाऱ्या प्रत्येक पावसाळ्यात हे मिस्त्री घर पाहायला यायचे. त्यांनाही या घराच्या बांधकामाबद्दल विश्वास वाटू लागला व इतर गावकऱ्यांना मातीच्या घरांची महती सांगू लागले.
जुन्या कारगिरांच्या बांधकामातल्या ज्या त्रुटी होत्या त्या सुधारण्याचा प्रयत्न प्रतीकने केला. दगड किंवा मातीचे बांधकाम करताना आपण काय गोष्टींचा विचार केला पाहिजे, मातीचे स्टॅबिलाईजेशन कसे करायचे हे आधुनिक ज्ञान त्यांना देऊन त्यांचे पारंपरिक ज्ञान प्रतीकने घेतले. पर्यावरणपूरक स्वच्छतागृहे, ग्राम समुदाय केंद्र आणि ‘हेमालया अर्थ होम’,‘प्रधान व्हिला’ यांसारख्या पर्यावरणपूरक घरांची रचना प्रतीक आणि त्याच्या टीमने केली आहे.
प्रतीकने उभी केलेली ही पर्यावरणपूरक घरांची चळवळ आता भारतभरात पोहोचली आहे. गावातल्या स्थानिक कारागीर आणि मिस्त्रींना घेऊन त्याने 45 जणांची टीम तयार केली आहे. भारतात अनेक ठिकाणी जाऊन तिथे उपलब्ध असलेल्या नैसर्गिक साधनांचा अभ्यास करून तिथल्या वातावरण आणि संस्कृतीला पूरक अशी घरे प्रतीक बांधत आहे.
फक्त दगड व माती यांपासून बनवलेली घरे म्हणजेच पर्यावरणपूरक घरे असे नाही, तर स्थानिक नैसर्गिक घटकांच्या उपलब्धतेनुसार बांधलेली घरेही पर्यावरणपूरक असतात. शहरांमध्ये अशी घरे बांधता येत नाहीत. कारण शहरांमध्ये माती उपलब्ध नसते, परंतु या घरांच्या रचना पर्यावरणपूरक करता येऊ शकतात. अनेक रिसायकल आणि रियुज घटकांमुळे ऊर्जेची बचत होऊ शकते. मुंबईत डिजाईन केलेल्या घरांमध्ये फॉलसिलिंग टाळून भारतीय कोटा दगडाचा वापर प्रतीकने केला. त्यामुळे मुंबईच्या दमट वातावरणात घराचे आतले वातावरण कमी राहण्यास मदत होते. शिप यार्डमधल्या जुन्या लाकडांचा वापर फर्निचरमध्ये केला.
(लेखिका मुक्त पत्रकार आहेत.)

























































