
रिक्षा प्रवासात अनुभवायला येणारे गळके छप्पर, फाटलेले सीट, तुटलेला पत्रा आणि सतत कानावर पडणाऱया कुरकुर आवाजातून आता प्रवाशांची सुटका होणार आहे. सर्वसामान्यांचा रिक्षा प्रवास सुरक्षित व्हावा म्हणून राज्य परिवहन प्राधिकरणाने रिक्षाच्या निवृत्तीचे वय 20 वरून 15 वर्षांपर्यंत खाली आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रात (एमएमआर) 1 ऑगस्ट 2021 पासून होणार आहे. त्यामुळे 15 वर्षांवरील रिक्षा भंगारात काढाव्या लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मुंबई, ठाण्यासह राज्यभरात जवळपास 10 लाख रिक्षा असून त्याने प्रवास करणाऱ्यांची संख्या कोटींच्या घरात आहे. त्यामुळे रिक्षाने प्रवास करणाऱया प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने विविध उपाय योजना सुचवणे, रिक्षाचे निवृत्तीचे वय काय असावे याबाबत अभ्यास करून अहवाल देण्याबाबत राज्य परिवहन प्राधिकरणाने माजी सनदी अधिकारी बी. सी. खाटुआ यांच्या नेतृत्वाखाली समिती नेमली होती. त्यानुसार त्यांनी सादर केलेला अहवाल सरकारने 2017 मध्ये स्वीकारला आहे. त्यामुळे एमएमआर क्षेत्रामध्ये 1 ऑगस्ट 2021 पासून 15 वर्षापुढील रिक्षा चालवता येणार नसल्याचे राज्य परिवहन प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे. तर उर्वरित महाराष्ट्रात 1 ऑगस्ट 2024 पासून याची अंमलबजावणी केली जाणार आहे. याआधी ऑगस्ट 2013 मध्ये 20 वर्षे एवढे रिक्षाचे निवृत्ती वय निश्चित केले होते.

























































