चांदिवलीच्या नाल्यात रिक्षा, लोखंडी डस्टबीन, शिवसेनेच्या प्रयत्नांनंतर अडथळा दूर; प्रवाह सुरळीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चांदिवली विधानसभा क्षेत्रातील टिळकनगर आणि सत्यनगर येथील मुख्य नाल्यांच्या साफसफाईचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. दरम्यान, सत्यनगर ब्रिजखालील 48 इंची जलवाहिनीमध्ये मोठा अडथळा निर्माण झाल्याने पाण्याचा प्रवाह होत नसल्याचे समोर आले होते. याबाबत माहिती मिळताच शिवसेनेने घटनास्थळी धाव घेत महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने पाहणी केली असता त्यात रिक्षा व पालिकेचा लोखंडी डस्टबीन अडकल्याचे लक्षात आले. त्यानंतर हा अडथळा दूर करून नाल्याचा प्रवाह सुरळीत करण्यात आला.

चांदिवली विधानसभा क्षेत्रातील शिवसेनेच्या नगरसेविका चित्रा सांगळे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे विभागातील सर्व मोठय़ा नाल्यांची पावसाळय़ापूर्वी व्यापक साफसफाई केली जात आहे. दरम्यान सत्यनगर येथील नाल्यातील पाण्याचा प्रवाह सुरळीत होत नसल्याची माहिती विभागप्रमुख सोमनाथ सांगळे यांना मिळाली. त्यांनी घटनास्थळी धाव घेत महापालिका अधिकाऱ्यांना पाचारण केले. महापालिका कर्मचाऱ्यांनी पाहणी केली असता नाल्यात रिक्षा आणि लोखंडी डस्टबीन अडकल्याचे लक्षात आले. त्यानुसार पथकाने जेसीबीच्या सहाय्याने ते बाहेर काढले. यावेळी पर्जन्य जलवाहिनी विभागाचे दुय्यम अभियंता अमरदीप सहारे, पालिका कर्मचारी तसेच शाखाप्रमुख हिरालाल यादव आदी उपस्थित होते.

नागरिकांना आवाहन

पावसाळय़ात पाण्याचा निचरा होण्यास अडचण होऊ नये यासाठी स्थानिक नागरिकांनी नाल्यांमध्ये कचरा, प्लॅस्टिक किंवा कोणत्याही मोठय़ा वस्तू टाकू नयेत, असे आवाहन यावेळी प्रशासनाकडून करण्यात आले आहे.