ऍव्हेंजर्सने दिली बाहुबलीला टक्कर, दोन दिवसांत 100 कोटी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

हॉलीवूडचे सिनेमे बॉलीवूडला तगडी टक्कर देतायत हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. नुकत्याच रिलीज झालेल्या ऍव्हेंजर्स एंडगेमने अवघ्या 2 दिवसांत हिंदुस्थानात 100 कोटी रुपयांची घसघशीत कमाई करत बाहुबली 2 सिनेमाचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे.आतापर्यंत हिंदुस्थानात सर्वाधिक कमाई करणार्‍या बाहुबली 2 ने तीन दिवसांत 100 कोटी रुपये कमावले होते.

मार्व्हल्स सिनेमाच्या ऍव्हेंजर्स एंडगेमची क्रेझ जगभरात आहे. हिंदुस्थानातही प्रेक्षक आतुरतेने या सिनेमाची वाट पाहत होते. हिंदुस्थानात 2845 स्क्रीनवर रिलीज झालेल्या ऍव्हेजर्स एंडगेमची तब्बल 25 लाख तिकिटे बुक माय शोवर ऍडवान्समध्येच विकली गेली होती. हिंदुस्थानातील बहुतेक थिएटरमध्ये पहाटेदेखील शो ठेवण्यात आले होते. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी या सिनेमाने 53.10 कोटींची तर शनिवारी 51.40 कोटींची कमाई केली. रविवारी हा सिनेमा 50 कोटींची कमाई करून 150 कोटींचा पल्ला गाठेल.

शेवट फोडणार्‍याला प्रेक्षकांकडून मारहाण

‘ऍव्हेंजर्स एंडगेम’चित्रपटाच्या कथेविषयी प्रेक्षकांमध्ये फार उत्सुकता होती. चित्रपटाची कथा कुणी उघड करू नये, अशी अपेक्षा असते. हाँगकाँगमध्ये चित्रपटाचा शेवट फोडणार्‍या व्यक्तीला प्रेक्षकांनी बेदम मारल्याची घटना घडली आहे.हाँगकाँग इथल्या कॉसवे बे जवळील सिनेमागृहाबाहेर मोठमोठय़ाने ओरडून ऍव्हेंजर्स एंडगेमचा शेवट एकजण सांगत होता. त्यामुळे रागावलेल्या चाहत्यांनी या स्पॉयलर्सवर सर्व राग काढला.