‘एव्हिएशन’ विद्यार्थ्यांच्या करीयरचा प्रश्न सुटला! विमान क्षेत्रातील मंदीमुळे विद्यापीठ पर्यायी पदवी देणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जागतिक आर्थिक मंदीमुळे विमान क्षेत्रातील करीयरमध्येही नोकरी मिळणे मुष्कील झाले आहे. परिणामी मुंबई विद्यापीठ संलग्न महाविद्यालयांमध्ये ‘एव्हिएशन’ पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने ‘एव्हिएशन’ पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांना पर्यायी पदवी देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे ‘एव्हिएशन’ पदवी घेतलेल्या शेकडो विद्यार्थ्यांना इतर क्षेत्रांत नोकरी मिळवण्याची संधी उपलब्ध झाल्याने करीयरचा प्रश्न सुटला आहे.

वैमानिक आणि हवाई क्षेत्रातील करीयरसाठी असलेला  ‘बीएसस्सी एव्हिएशन’ हा कोर्स मुंबईत ठाकूर कॉलेज आणि बॉम्बे फ्लाइंग या ठिकाणी चालतो. शिवाय नाशिक, पुण्यात दोन ठिकाणी हा कोर्स शिकवला जातो. हा तीन वर्षांचा कोर्स पूर्ण केल्यानंतर व्यावसायिक वैमानिकाचा परवाना ‘डीजीसीए’कडून घेतल्यानंतर पदवी प्रमाणपत्र दिले जाते. मात्र हा परवाना घेण्यासाठी 30 ते 50 लाखांचा खर्च येतो. यातच वैमानिक क्षेत्रात सध्या असणारी मंदी आणि लाखो रुपयांचा खर्च करणे जिकिरीचे असल्याने ‘एव्हिएशन’ शाखेतील पदवीला इतर अभ्यासक्रमांची समकक्ष पदवी द्यावी अशी मागणी विद्यार्थ्यांमधून करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर युवासेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत, महादेव जगताप, राजन कोळंबकर, शशिकांत झोरे यांनी कुलगुरू सुहास पेडणेकर यांची भेट घेऊन विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घ्यावा अशी मागणी केली होती. यामुळे नुकत्याच झालेल्या विद्वत्त परिषदेच्या बैठकीत ‘एव्हिएशन’ कोर्स केलेल्या विद्यार्थ्यांना पर्यायी पदवी देण्याबाबत तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश अभ्यास मंडळाला दिले आहेत.

इतर क्षेत्रांत नोकरीची संधी मिळणार
दरम्यान, विद्वत्त परिषदेच्या बैठकीत विज्ञान शाखेचे अधिष्ठाता रवींद्र देशमुख यांनी संबंधित विद्यार्थ्यांना बीएसस्सी इन एव्हिएशन सायन्स किंवा बीएसस्सी इन फिजिक्स अशी पदवी द्यावी आणि पुढील शिक्षणासाठी ही पदवी ग्राह्य धरावी अशा सूचना दिल्याचे व्यवस्थापन परिषद सदस्य प्रदीप सावंत यांनी सांगितले. याबाबत कार्यवाहीदेखील सुरू झाल्याचे ते म्हणाले.