करी रोडच्या ‘अविघ्न’ इमारतीमध्ये भडका; वर्षभरात इमारतीला दुसऱ्यांदा आग, 80 जणांची सुखरूप सुटका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

करी रोड येथील ‘अविघ्न’ इमारतीला आज सकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली. 22 व्या मजल्यावरील एका बंद फ्लॅटमध्ये आगीचा भडका उडाला. या ठिकाणच्या फर्निचरसह मोठय़ा प्रमाणातील जळाऊ सामानामुळे काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले. संपूर्ण मजला आणि 23 व्या मजल्यावर आग-धुराचे लोळ पसरले. यावेळी अग्निशमन दलाने 70 ते 80 जणांना सुखरूपरीत्या बाहेर काढले. दरम्यान, 60 मजली याच ‘अविघ्न’मध्ये वर्षभरापूर्वी भीषण आग लागून एकाचा मृत्यू झाला होता.

करी रोड येथील महादेव पालव मार्गाजवळ ही उत्तुंग इमारत आहे. या इमारतीच्या 22 व्या मजल्यावरील 202 क्रमांकाच्या बंद फ्लॅटमध्ये  सकाळी 11 वाजता आगीचा भडका उडाला. या घरात राहणारी एक महिला पूजेनिमित्त घराबाहेर गेल्याने तिचा जीव वाचल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले. मात्र आग लागलेल्या फ्लॅटचा दरवाजा बंद असल्याने आग कशी विझवणार असा प्रश्न निर्माण झाला. यावेळी अग्निशमन दलाच्या जवानांनी दरवाजा तोडून आगीवर नियंत्रण मिळवण्यास सुरुवात केली. या ठिकाणच्या सुमारे 70 ते 80 रहिवाशांना दुसऱया विंगमधून सुखरूपरीत्या बाहेर काढण्यात आल्याचे  असिस्टंट डिव्हिजनल ऑफिसर व्ही. एन. सांगळे यांनी सांगितले. दरम्यान, अग्निशमन दलाने वेळीच बचावकार्य सुरू केल्याने मोठी दुर्घटना टळल्याचे मुंबई पोलीस ‘डीसीपी’ डॉ. प्रवीण मुंडे यांनी सांगितले.

…म्हणूनच मोठी दुर्घटना टळली

या इमारतीत गेल्या वर्षीच ऑक्टोबरमध्ये आग लागली होती. यावेळी अग्निशमन दलाच्या चौकशीत संबंधित इमारतीमधील अग्निशमन यंत्रणा ठप्प होती असे निदर्शनास आले. यावेळी पालिकेने इमारतीला नोटीस बजावण्यात आली होती. यानंतर संबंधित इमारत व्यवस्थापनाने अग्निशमन यंत्रणा तैनात ठेवली होती. त्यामुळे आजच्या आगीत अग्निशमन यंत्रणेचा वापर वेळीच सुरू झाल्याने मोठी दुर्घटना टळली.

रहिवाशांना अग्निशमन प्रशिक्षण आवश्यक

‘अविघ्न’ इमारतीमध्ये अग्निशमन यंत्रणा सुरू असली तरी ती कशी वापरावी याची माहिती रहिवाशांना नव्हती, असे माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी या ठिकाणी दिलेल्या भेटीदरम्यान सांगितले. या पार्श्वभूमीवर अग्निशमन दलाने रहिवाशांना प्रशिक्षण देण्याची गरज असल्याचे त्या म्हणाल्या.

दोन जवान जखमी

23 व्या मजल्यापर्यंत आग पसरल्याने 25 व्या मजल्यावरील रेफ्युज एरियात रहिवाशांना सुरक्षित ठेवण्यात आले. सुमारे सव्वा तासाच्या प्रयत्नांनंतर आगीवर पूर्ण नियंत्रण मिळवण्यात यश आले.

आगीत  अग्निशमन दलाचे दोन जवान किरकोळ जखमी झाले. रामदास सणस (37), महेश पाटील (26) अशी त्यांची नावे आहेत. उपचारानंतर प्रकृती सुधारल्याने दोघांना डिस्चार्ज देण्यात आला.