
शेतकरी कुटुंबातील अविनाश साबळे, कौटुंबिक परिस्थिती अत्यंत जेमतेम, भविष्य अंधकारमय, खेळाची आवड असूनही परिस्थितीचे भान असल्यामुळे आवड जोपासता येईना. मात्र या सर्व अडीअडचणीवर मात करत अविनाश पळत राहिला, धावत राहिला आणि याच धावण्याने त्याला शिखर गाठून दिले. आष्टीच्या अविनाश साबळेने आज बीड जिल्ह्यासह देशाला नावलौकीक मिळवून दिला.
आष्टी तालुक्यातील मांडवा या छोट्याशा गावातील अविनाश साबळे देशाचे नाव उज्वल करत आहे. अमेरिकेत झालेल्या सॅनजॉन कॅपिस्ट्रोनो येथे साऊंड रनिंग ट्रॅप मिटमध्ये त्याने इतिहास घडवला. पाच हजार मीटर शर्यतीत तब्बल 30 वर्षाचा जुना विक्रम मोडीत काढत बीडच्या या बहाद्दर वाघाने नवा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला. त्याने 13 मिनिट 25.65 सेकंदामध्ये 5000 मीटरचे अंतर पार केले आणि 1992 मध्ये 13 मिनिट 29.70 सेकंदाचा विक्रम करणाऱ्या बहादुर प्रसाद यांना मागे सोडले.
आयुष्यभर संघर्ष करत काही तरी मिळवण्यासाठी सतत धावत राहणाऱ्या अविनाशला यश हुलकावणी देत होतं. नऊ वर्षापूर्वी संभाजीनगर येथील सैन्य दलामध्ये महार बटालियन विभागात त्याला भरती व्हावे लागले. पहिल्याच प्रयत्नामध्ये तो भरती झाला. त्याला सियाचीन येथे नियुक्ती देण्यात आली. पोटाची आग भागवण्यासाठी खेळाच्या आवडीकडे त्याने दुर्लक्ष केले मात्र तोच खेळ त्याला खुनवत होता. म्हणूनच सैन्य दलात होणाऱ्या मैदानी स्पर्धेत तो भाग घेत राहिला. प्राविण्य मिळवत राहिला. पुढे सियाचीनमधून राजस्थान येथे कमांडो म्हणून त्याची नियुक्ती झाली.
मांडव्याच्या धनगर वस्तीत अविनाशचे छोटेसे घर आहे. वडील मुकींदा साहेबराव साबळे, आई वैशाली मुकींदा साबळे हे अल्पभूधारक कुटुंब, शेती आणि शेतमजुरी करून जगत होते. दोन मुले आणि एक मुलगी असा त्यांचा परिवार. अविनाशचे पहिले ते सातवीपर्यंतचे शिक्षण मांडवा येथेच झाले. खेळाची आवड असल्याने शालेय जीवनात प्रत्येक क्रीडा स्पर्धेत तो कायम भाग घ्यायचा, तालुकास्तरावर, जिल्हास्तरावर, राज्यपातळीवर तो धावायचा आणि स्पर्धेक बघत राहायचे. मांडव्याचे शिक्षक हनुमंत मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली त्याची क्रीडा प्रबोधनीमध्ये निवड झाली. दहावीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर कड्याच्या अमोल विद्यालयामध्ये महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. शिक्षण सुरू असताना धावणेही चालूच होते. हेच धावणे भविष्यात त्याला उंच शिखरावर नेवून ठेवणार आहे याचा आत्मविश्वास होता.
ध्येय आणि जिद्द
ध्येय गाठायचंय ही जिद्द मनात असल्यावर अशक्य काही नाही हे अविनाशने दाखवून दिले. मी जिंकणारच या वाक्याची खूनगाठ त्यांनी बांधून ठेवली होती. शाळेत असताना त्याच्या प्रत्येक वहिवर त्याने हे लिहिलेले असायचे की मी जिंकणारच. शालेय विद्यार्थी असताना शांत संयमी असणारा अविनाश गुरूजींचा आज्ञाधारक विद्यार्थी होता. शिक्षक मार्गदर्शन करत गेले, अविनाश मार्गदर्शन घेत गेला आणि आज तो अजिंक्य झाला.
अविनाश देशाला गोल्ड मेडल मिळवून देणार
जिद्द आणि चिकाटी याच्या जोरावर अथक परिश्रमातून यशाच्या दिशेने धावणारा अविनाश नक्कीच देशाचे नाव सुवर्ण अक्षरात जोडणारा आहे. तो देशाला ऑलम्पिक स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल मिळवून देणार हा विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया अविनाशचे शाळेचे शिक्षक हनुमंत मुटकुळे यांनी दिली.
अविनाश सैन्य दलात भरती झाला. त्याच्या भविष्याची चिंता मिटली. मात्र तो एवढ्यावरच थांबला नाही. लहानपणापासून हृदयामध्ये त्याने जे कोरून ठेवले होते ते पूर्ण केले. आज त्याने मिळवलेले यश या पिढीसाठी दिशादर्शक आहे. त्याचा मला अभिमान वाटतो.
-मुकींदा साबळे, अविनाशचे वडील.
अविनाशची वाटचाल
आपले महाविद्यालयीन शिक्षण सुरू असताना अविनाशने सैन्य भरतीची तयारी सुरू केली. पहिल्याच प्रयत्नामध्ये त्याला यश मिळाले. धाराशिव येथे झालेल्या भरतीत अविनाश उत्तीर्ण झाला, त्याच्यातील क्रिडा कौशल्य वरिष्ठांनी हेरून त्याला पूर्ण वेळ खेळासाठी परवानगी दिली. 2017 ला त्याने पहिल्या राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेतला. सलग दोन वर्षे राष्ट्रीय स्पर्धेत पदक मिळवले. 2018 मध्ये आशियाई स्पर्धेत रौप्यपदक पटकावले. तसेच राष्ट्रीय स्पर्धेत तीन हजार मीटर स्टीपल चेस स्पर्धेत 37 वर्षाचा विक्रम त्याने मोडीत काढला. आज अमेरिकेत धावत 30 वर्षा पूर्वीचा रेकॉर्ड त्याने मोडला.




























































