
आरोग्य जपणे आणि रोगप्रतिकारक्षमता वाढवणे या दोन्ही गोष्टींना हल्लीच्या काळात अत्यंत महत्त्व आहे. वातावरणातील संसर्गजन्य आजारांशी लढण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती बळकट असण्याची आवश्यकता असते. नाहीतर आजारांना सामोरे जावे लागू शकते. जर तुम्हाला आजारी पडू नये आणि रोगप्रतिकारशक्ती वाढावी असे वाटत असेल तर रोजच्या आहारात काही अन्नपदार्थ टाळण्याची आवश्यकता आहे. पाहूया असे कोणते अन्नपदार्थ आहेत जे वर्ज्य केले तर तुमचे आरोग्य उत्तम राहू शकते.
सोडा, कोल्ड्रिंक
तहान लागली की, काहींना घसा थंड करणारी कोल्ड्रिंक प्यायला आवडतात. यामुळे तहान शमत असली तरीही कोल्ड्रिंग प्यायल्याने रोगप्रतिकारशक्तीवर नकारात्मक परिणाम होतो. सोडा, कोल्ड्रिंक्स यामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते शिवाय कॅलरीजही जास्त प्रमाणात असतात. त्यामुळे शरीराचे पोषण होत नाही. शिवाय सोडा किंवा कोल्ड्रिंक्स नियमित सेवन केल्याने लठ्ठपणाचा धोका वाढू शकतो. यामुळे रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊ शकते.
अतिमसालेदार आणि तळलेले पदार्थ
काही जणांना तळलेले, अतितेलकट, मसालेदार पदार्थ जास्त प्रमाणात खायला आवडत असतील तर ते प्रतिकारशक्तीसाठी हानिकारक ठरू शकते. तळलेल्या पदार्थांमध्ये चरबीचे (फॅट) प्रमाण जास्त असते. त्यामुळे तळलेल्या पदार्थांऐवजी बेक केलेले पदार्थ खाऊ शकता.
अल्कोहोलचे व्यसन
अल्कोहोलयुक्त पेयांचे व्यसन असल्यास रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते. यामुळे झोपेवर परिणाम होऊन पुरेशी झोप होत नाही. त्यामुळे संपूर्ण आरोग्यच बिघडू शकते. काही जणांना यामुळे लठ्ठपणा येऊ शकतो.
बेकरी उत्पादने
पाव, खारी, टोस्ट, कुकीज, पेस्ट्री, केक असे बेकरी पदार्थ मैद्याच्या पिठापासून तयार केलेले असतात. यामध्ये ग्लूटन, फॅट आणि कॅलरीचे प्रमाण जास्त असते. मैदा, साखर आणि तेलाचा वापर करून हे पदार्थ तयार केले जातात. याचा परिणाम रोगप्रतिकारक्षमतेवर होतो. त्यामुळे मैद्याऐवजी गव्हापासून तयार केलेले पदार्थ खावेत. रोजच्या आहारातही मैद्याऐवजी गहू किंवा ज्वारी, बाजरी, नाचणी या पिठांचा समावेश करावा.
साखर
पांढरी साखर कँण्डीज, चॉकलेट्स, केक, डोनट्स, बिस्किटे यामध्ये वापरली जाते. त्याचप्रमाणे टोमॅटो केचअप, ब्रेड आणि पास्त्यामध्येही या साखरेचा वापर केला जातो. साखर रोगप्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी घातक समजली जाते. त्यामुळे गोड पदार्थ जास्त आवडत असतील तर काळजी घ्या.



























































