गणेशोत्सवात भारनियमन नको, शिवसेनेची वीज वितरणकडे मागणी

सामना प्रतिनिधी । कुडाळ

माणगांव खोऱ्यातील वीज समस्या तातडीने मार्गी लावून गणेशोत्सव काळात वीज पुरवठा नियमित चालू ठेवावा, अशी मागणी जि.प.चे शिवसेनेचे सदस्य राजू कविटकर यांनी माणगांव वीज वितरणकडे केली आहे. याबाबतचे निवेदन सहाय्यक अभियंता यांच्याकडे देण्यात आले.

माणगांव खोरे हा भाग अतिदुर्गम असल्यामुळे येथे विद्युत समस्या वाढत आहे. या समस्या तातडीने मार्गी लावाव्यात. कोकणातील महाउत्सव गणेश चतुर्थी सण तोंडावर आला असून या काळात वीज पुरवठा खंडीत न करता नियमित सुरू ठेवावा. तसेच घरगुती नवीन कनेक्शन असतील त्यांना तातडीने देण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्धारे वीज वितरणकडे करण्यात आली. यावेळी जि.प.सदस्य राजू कविटकर, पं.स.सदस्या सौ. शरयु घाडी, माजी उपसभापती बबन बोभाटे आदींसह शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते. वीज वितरणच्या अधिकाऱ्यांनी आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.