महापालिका माध्यमिक शिक्षक संघातर्फे आप्पासाहेब देसाई, विनय राऊत यांना पुरस्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महापालिका माध्यमिक शिक्षक संघ आणि सुरेश डावरे सहकारी पतसंस्था, मुंबईच्या वतीने शिक्षक दिनाचे औचित्य साधून शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान देणाऱया शिक्षकांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. शिक्षकांचे न्यायालयीन प्रश्न सोडविणारे आप्पासाहेब देसाई यांना डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन पुरस्कार व रोख रुपये 21 हजार तर शिक्षण क्षेत्रातील संशोधनात्मक कार्याबद्दल विद्या विकास एज्युकेशनचे मानद सचिव विनय राऊत यांना अरुण मेहता पुरस्कार व रोख रुपये 15 हजार जाहीर झाला आहे. येत्या 5 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता मुलुंड पश्चिम येथील कालिदास नाटय़गृहात हा पुरस्कार सोहळा होणार आहे.

संघटनात्मक कार्यात उभे आयुष्य खर्च करून निष्ठsचा आदर्श घालून देणाऱया परिणिता माविनकुर्वे, प्रभाकर माडकर, मोहम्मद मुज्जाहिद, म्हतू कुऱ्हाडे, माधव भादलीकर, जयेंद्रनाथ पिंपळ यांना ‘संघश्री’ पुरस्कार जाहीर झाला आहे. रोख रुपये 7 हजार 500, शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. संस्थेचा मानाचा साने गुरुजी पुरस्कार यंदा प्राजक्ता बिरारी, रवींद्र पाटील, लक्ष्मीशंकर तिवारी यांना तर संघटनात्मक कार्यासह सृजनात्मक उपक्रमशिलता जपणाऱया शिक्षकांसाठी देण्यात येणारा आदर्श कार्यकर्ता पुरस्कार अरुण इंगळे, आप्पासाहेब बागल, सुरेश आभाळे, रत्नाकर विटकर, रवींद्र पाटी यांना जाहीर झाला आहे.

शाळेच्या कर्तव्यदक्ष मुख्याध्यापकांनाही पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असून रोख रुपये 5 हजार 500 शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. यंदा सुनील पाटील आणि अंबरसिंग मगर यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे, अशी माहिती संघ प्रतिनिधी सुरेश आभाळे यांनी दिली.