
शाळा, महाविद्यालयात जाणारे विद्यार्थी, लोटे औद्योगिक वसाहतीत कामावर जाणारे कामगार यांच्या वर्दळीने दिवसरात्र कायम रहदारी असलेला आवाशी-गुणदे-शेल्डी रस्ता पूर्णपणे खड्ड्यात गेला असल्याने या रस्त्यावर भीषण दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे या रस्त्यावरून तालुका आणि जिल्हा पातळीवर काम करणारे चार लोकप्रतिनिधी सतत ये जा करत असतात. मात्र तरीही रस्त्याची दुरवस्था असल्याने या रत्यालगतच्या गावातील ग्रामस्थांकडून संताप व्यक्त होत आहे.
खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील कारखानांमध्ये काम करणारे, अनेक कामगार दिवसरात्र आवाशी-गुणदे -शेल्डी रस्त्यावरून ये जा करत असतात. यातील बहुतांशी कामगार हे आपल्या दुचाकीने प्रवास करतात. रस्त्यावर खड्डे असल्याने आणि रात्रीच्या काळोखात हे खड्डे दिसत नसल्याने कामगाराना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो आहे. दुचाकी खड्ड्यात जाऊन किंवा बाहेर आलेल्या खडीवरून घसरून आतापर्यंत काही अपघातही झालेले आहेत. मात्र खड्ड्यात गेलेल्या रस्त्याची कैफियत मांडायची कुणाकडे हा प्रश्न असल्याने कामगार मृत्युची टांगती तलवार डोक्यावर घेऊन या रस्त्याने मार्गक्रमण करत आहेत.
मुंबई गोवा हायवेला जोडणाऱ्या या रस्त्यावर आवाशी, गुणदे, शेल्डी, भेलसई , कुळवंडी, खोपी, आंबडस अशी अनेक गावे आहे. याच रस्त्याने कळंबस्ते मार्गे चिपळूणला जाता येते तसेच खेड तालुक्याच्या धामणंद पट्ट्यातही जाणाऱ्यांना याच रस्त्याचा वापर करावा लागतो. या मार्गावरील गुणदे येथे विद्यालय असल्याने या ठिकाणी शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. या गावांमध्ये एखादी व्यक्ती गंभीर आजारी झाली तर त्या व्यक्तीला खेड किंवा चिपळूण शहरातील रुग्णालयामध्ये नेण्यासाठी हाच रस्ता आहे. मात्र हा रस्ता सुस्थितीत नसल्याने गुणदे येथील विद्यालयात येणारे विद्यार्थी, रुग्ण, पादचारी यांच्यसह लोटे औद्योगिक वसाहतीत कामावर येणारी कामगाराना त्रास सहन करावा लागतो आहे.
आवाशी-गुणदे -शेल्डी या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी दोन वर्षांपूर्वी दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. ठेकेदाराने कामालाही सुरुवात केली होती. मात्र आवाशी येथील एका पुलाचे काम वगळता रस्त्याचे काम झालेले नाही. सद्यस्थितीत कामही बंद आहे. काम का बंद आहे ? याची माहिती घेतली असता ठेकेदार रस्त्याचे काम सोडून निघून गेला असल्याचे सांगण्यात आले त्यामुळे भविष्यात हा रस्ता होणार कि नाही यावर प्रशचिन्ह निर्माण झाले आहे.
या रस्त्यालगतच्या गावांमध्ये राहणारे चारजण तालुका आणि जिल्हा पातळीवर जनतेचे नेतृत्व करत आहेत. मात्र या लोकप्रतिनिधींना आपल्या गावाला जोडणाऱ्या रस्त्याचे काम करणे जमत नाही ते जनतेची कामे काय करणार अशी चर्चा आत्ता ग्रामस्थांनी सुरु केली आहे. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत या लोकप्रतिनिधींना जाब विचारण्याचा निर्धार येथील जनतेने केला आहे.
गेली अनेक वर्षे दुरुस्ती रखडलेला हा रस्ता आता जिल्हा परिषद बांधकामकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग झाला आहे. रस्त्याच्या कामासाठी आता साडेतीन कोटी रुपयांचा निधी मंजूर असून लवकरच कमला सुरवात होईल. तत्पूर्वी रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्याचे काम तात्काळ सुरु केले जाईल. – राजेंद्र आंब्रे , जिल्हा परिषद सदस्य






























































