अयोध्येत 22 जानेवारीला रामलल्ला प्राणप्रतिष्ठेचा सोहळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगभरातील कोटय़वधी रामभक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या तळमजल्याचे काम डिसेंबर महिन्याच्या अखेरीस पूर्ण होणार असून, 22 जानेवारी 2024च्या शुभमुहूर्तावर रामलल्ला गर्भगृहात विराजमान होतील. यावेळी रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठsचा सोहळा 22 जानेवारीला होणार असल्याची माहिती राम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी दिली आहे. आचार्य सत्येंद्र दास यांनी ‘एएनआय’ वृत्तसंस्थेची बोलताना सांगितले की, ‘15 ते 24 जानेवारी या कालावधीत अनुष्ठान सोहळा, धार्मिक विधी होणार आहेत. आम्ही पंतप्रधान कार्यालयाला पत्र पाठविले असून, त्याचे उत्तरही मिळाले आहे. 22 जानेवारीला रामल्लांच्या प्राणप्रतिष्ठsचा सोहळा होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार असून, यावेळी अन्य लोकांनाही बोलाविले आहे.’ राम मंदिर समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा म्हणाले, ‘राम मंदिराच्या तीन मजल्यांचे काम वेगाने सुरू आहे. तळमजल्याचे काम डिसेंबरअखेरपर्यंत पूर्ण होईल. 22 जानेवारी 2024 रोजी प्राणप्रतिष्ठा होईल.’