
शिवशाहीर बाबासाहेबांना मी कोल्हापुरातील एका कार्यक्रमात पहिल्यांदा भेटले होते. आमची 58 वर्षांची ओळख आहे. बाबासाहेबांनी अनेक गडकिल्ले सर केले, त्याचे वर्णन त्यांनी मला ऐकवले. मनाची ताकद असल्यानेच त्यांनी हे शिवधनुष्य पेलले. यापुढेही त्यांनी खूप आयुष्य जगावं, अशा भावना ज्येष्ठ गायिका, पद्मविभूषण आशा भोसले यांनी व्यक्त केल्या.
शिवशाहीर, पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या शतकमहोत्सवी वर्षानिमित्त जीवनगाणी, जयसत्य चॅरिटेबल ट्रस्ट आणि स्वरगंधारतर्फे आंबेगाव येथील शिवसृष्टी येथे आयोजित कार्यक्रमात शिवशाहीर यांचा आशा भोसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, आमदार आशिष शेलार, ज्येष्ठ इतिहासकार गजानन मेहेंदळे यावेळी उपस्थित होते. यावेळी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित ‘ओंजळ’ या पुस्तकाचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झाले.
आशा भोसले म्हणाल्या, देवाने मला आणखी 50 वर्षे आयुष्य दिले तर 25 वर्षे मी बाबासाहेबांना देऊन टाकते. बाबासाहेबांना मी काहीही दिलेले नाही. परंतु, आज त्यांच्या चरणी एक लाख एक रुपये अर्पण करून कृतज्ञता व्यक्त करते.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे म्हणाले, मंगेशकर कुटुंबातील सगळी भावंडे मला प्रिय आहेत. मनाचे औदार्य असणारे मंगेशकर कुटुंब आहे.
जीवनात मी तृप्त आहे…
आयुष्यात प्रेम करायला शिका. माणसाने आयुष्य हसतखेळत आणि विनोदबुद्धी जागृत ठेवत जगले पाहिजे. कोणाचा विद्वेष किंवा मत्सर आपण करता कामा नये. प्रेमाने राहायला, जगायला शिकले पाहिजे. लोकांचे मला खूप प्रेम मिळाले. जीकनात मी आनंदी, संतुष्ट, तृप्त, सुखी आहे. लोकांकडून मिळणारे हे प्रेम पाहिले की पुन्हा एकदा इथे जन्माला यावे वाटते, असे उद्गारही शिवशाहिरांनी यावेळी काढले.

























































