बाभुळगाव तालुक्यात गारपिटीचा तडाखा , शेतकरी हवालदिल ,गहू, हरभरा पिकाचे मोठे नुकसान

>> प्रसाद नायगावकर

यवतमाळ जिल्ह्यात काही तालुक्यात सकाळपासूनच ढगाळी वातावरण असतांना सायंकाळच्या सुमारास बाभुळगाव तालुक्यातील खर्डा, येरणगाव, किन्ही-गोंधळी, गवंडी आदी गावांना काल सायंकाळच्या सुमारास गारपिटीचा तडाका बसला आहे.वादळीवा-यासह गारपिटीने शेतशेवारातील उभे असलेले गहू व हरभरा पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे .

राज्यातील काही भागात अजूनही थंडीचा जोर कायम असला तरी आगामी काही दिवसात राज्यातील अनेक भागांमध्ये पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या अवकाळी पावसाच्या पुनश्च आगमनाने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने(IMD) दिलेल्या माहितीनुसार, पुढील पाच दिवस विदर्भातील बहुतांश भागात तुरळक ते हलक्या स्वरूपात पावसाच्या सरी कोसळणार असल्याचा इशारा दिला आहे. पावसाच्या ढगांनी दाटी केल्याने विदर्भातील तापमानात घट झाली या पावसाचा संभाव्य धोका लक्षात घेता शेतकऱ्यांसह नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, अशा सूचना देखील नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने दिल्या आहेत.

सुलतानी-अस्मानी संकटे शेतकऱ्यांच्या नशिबी आहे. खरीप हंगामातील पिकांची आलेली तूट रब्बी हंगामात निघावी म्हणून सिंचन सुविधा उपलब्ध असणार्‍या शेतकर्‍यांनी गहू व हरभराचे पिक पेरले. अशातच ऐन दोन्ही पिक काढणीच्या वेळेस आज शनिवारी सायंकाळच्या सुमारास तालुक्यातील अनेक गावांना गारपिटीचा फटका बसला. शेतशिवारातील उभे असलेले शेतपिक वादळीवारा व गारपिटीने जमीन दोस्त झाले आहे. या नैसर्गिक संकटामुळे शेतकर्‍यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. संकटात सापडलेला शेतकरी वर्गांना दिलासा देण्यासाठी महसुल विभागाने सर्वे करून नुकसानाची माहीती शासनाला द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकर्‍यांकडून होत आहे.