
चार महिन्यांच्या मुलाचे अपहरण करून त्याला तेलंगणा येथील जोडप्याला विपू पाहणाऱया तिघांच्या जुहू पोलिसांनी मुसक्या आवळल्या. महेश डिट्टी, रमेश व्यंपटी आणि डॉ. मोहम्मद नसरुद्दीन बशीरुद्दीन अशी त्या तिघांची नावे आहेत. पोलिसांनी त्या मुलाची सुखरूप सुटका करून त्याला त्याच्या पालकाच्या ताब्यात दिले.
अपहरण झालेला मुलगा हा त्याच्या आई-वडिलांसोबत अंधेरी येथे फुटपाथवर राहतो. गेल्या बुधवारी रात्री मुलगा आई-वडिलांसोबत झोपला होता. पहाटेच्या सुमारास मुलगा जागेवर नसल्याने त्याच्या आई वडिलांच्या निदर्शनास आले. आई-वडिलांनी मुलाचा शोध घेतला. पण मुलगा न सापडल्याने अखेर त्यानी जुहू पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्याची गंभीर दखल घेऊन जुहू पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला. पश्चिम प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी अधिकाऱयांना सूचना दिल्या. वरिष्ठ निरीक्षक पंढरीनाथ व्हावळ यांच्या पथकातील सहायक निरीक्षक हरी बिरादार, गणेश तोडकर, सागर भोसले, पूनम मिरगणे आदींच्या पथकाने तपास सुरु केला. पोलिसांनी त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. तपासा दरम्यान पोलिसांना महेशची माहिती मिळाली. जुहू पोलिसांचे एक पथक तेलंगणा येथे रवाना झाले. तेथून त्या तिघांना अटक करून मुंबईत आणले. चौकशीत त्या तिघांनी मुलाच्या अपहरणाची कबुली दिली. त्या तिघांना बुधवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.
दोन महिन्यांपूर्वी रचला कट
डॉ. मोहमदकडे काही महिन्यांपूर्वी एक जोडपे आले होते. त्या जोडप्याला मूल होत नसल्याचे त्यांनी डॉ. मोहमदला सांगितले होते. त्यानंतर डॉ. मोहमदने रमेश आणि महेशला कोणी मूल आणून दिल्यास पैसे देऊ असे त्या दोघांना सांगितले. कर्जबाजारी झालेल्या त्या दोघांनी दोन महिन्यापूर्वी अपहरणाचा कट रचला. घटनेच्या दोन दिवस अगोदर महेश आणि रमेश या दोघांनी अंधेरी परिसरात रेकी केली. रेकी केल्यानंतर रमेशने त्या मुलाला उचलले. मुलाला अंधेरी येथून खासगी वाहनाने तेलंगणा येथे नेले. डॉ. मोहमदकडे त्या मुलाला दिले गेले. त्या मुलाचा चार लाखात खरेदी-विक्रीचा व्यवहार झाला होता.




























































