उसाच्या शेतात आढळले बिबटय़ाचे बछडे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऊसतोडणी सुरू असताना उसाच्या शेतामध्ये बिबटय़ाचे दोन बछडे आढळून आले आहेत. तालुक्यातील खळी या गावात साहेबराव तांबे या शेतकऱयाच्या उसामध्ये बिबटय़ाचे दोन बछडे आढळून आले आहेत. ऊसतोड सुरू असताना हे बछडे आढळल्याने या ठिकाणी बिबटय़ाचा वावर असल्याने घबराट निर्माण झाली आहे. वन विभागाच्या कर्मचाऱयांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

खळी शिवारात साहेबराव तांबे यांचा ऊस तोडीला आला आहे. रविवारी सकाळी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे ऊसतोडणी कामगार ऊसतोड करीत असताना उसामध्ये आवाजासह काही हालचाली तोडणी मजुरांना जाणवल्या. त्यामुळे त्यांनी सावधपणे परिस्थितीचा अंदाज घेत पुढे जाऊन बघितले असता, त्यांना उसाच्या क्षेत्रामध्ये बिबटय़ाचे दोन नवजात बछडे दिसून आले. त्यांनी याची माहिती साहेबराव तांबे यांना दिल्यानंतर हा प्रकार वन विभागाला कळविण्यात आला. त्यानंतर वन विभागाचे कर्मचारी तेथे दाखल झाले होते. त्यांनी तातडीने ऊसतोडणी थांबवीत हा संपूर्ण परिसर निर्मनुष्य केला. बिबटय़ाचे दोन्ही बछडे वन विभागाने ताब्यात घेतले आहेत. चवताळलेला बिबटय़ा हल्ला करण्याची शक्यता लक्षात घेता, वन विभागाच्या अधिकाऱयांनी बिबटय़ाचे बछडे तेथेच ठेवण्याचा निर्णय वन विभागाच्या अधिकाऱयांनी घेतला आहे. मादी आपले बछडे येथून घेऊन जाईल, अशी व्यवस्था वन विभागाच्या वतीने करण्यात आली आहे. वन विभागाचे अधिकारी-कर्मचारी बछडय़ांवर लक्ष ठेवून आहेत.