Jalana: बदनापूर तालुक्याला अवकाळीने झोडपले; गारपीटचा मार, लग्नाचा मंडप हवेने उडाला, शेतकऱ्यांवर अस्मानी संकट

hailstorm

जालन्यातील बदनापूर तालुक्यातील शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले आहे. आज 5 मे रोजी दुपारनंतर अचानक जोरदार वादळी पावसासह गारपीटने शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान केले. जोरदार हवेने अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली तर गारपीट व हवेच्या प्रचंड लोटाने गेवराई येथील विवाह समारंभाचा मंडप उडून प्रचंड नुकसान झाले. कर्जमाफीचे आश्वासन तोडून सुलतानी संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना आज अस्मानी संकटाच्या माऱ्याने त्यांच्या उत्पन्न वाढीच्या उरल्या सुरल्या आशाही मातीमोल केल्या अशा भावना आता व्यक्त होऊ लागल्या आहेत.

बदनापूर तालुक्याला पुन्हा अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. हवामान विभागाने राज्यात अवकाळी पावसाचा यापूर्वीच अंदाज वर्तवला होता. बदनापूर तालक्यातील गेवराई बाजार, वाल्हा, कंडारी, अकोला, निकळक, सोमठाणा, गोकूळवाडी सह अने मंडळात गारपीट झाल्याने भाजीपाला आणि फळपिकांचं मोठं नुकसान झाले. या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांनी सोंगणी करून मळणीसाठी उन्हाळी मका, बाजरी, ज्वारी पिके एकत्रित करून ठेवलेली होती ती पूर्णपणे भिजून त्यांचे प्रचंड नुकसान झाले असून अनेक पीक जमीन दोस्त झाले. या पावसामुळे झालेल्या नुकसानीची पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. बदनापूर तालुक्यात अंबा पिकाचे मोठे उत्पादन आहे. मात्र, यंदा उन्हाच्या प्रचंड तडाख्याने दर वर्षीपेक्षा हे झाडांना कमी आंबे लगडलेले होते. मात्र, आजच्या गारपीटने उरले सुरले आंबेही पडून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. भाजीपाला, नुकतीच लावलेली मिरची, टॉमेटो आदी पिकांचेही नुकसान झालेले आहे. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज मार्फी देण्यात येईल असे आश्वासन सत्तेत येण्यापूर्वी देण्यात आलेले असताना शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसणाऱ्या सरकारवर तालुक्यात प्रचंड रोष असताना मोठया आशेने फळबागा व भाज्या, पालेभाज्याच्या उत्पादनावर अंवलबून असलेला शेतकरी या आस्मानी संकटाने पूर्णपणे खचला आहे.

गेवराई बाजार येथील ज्ञानेश्वर रामभाऊ जोशी यांनी आपली भाची पूजा लोहकरे हिचा विवाह गेवराई बाजार येथे आयोजित केला होता. 5 मे रोजी दुपारी होणाऱ्या या विवाह सोहळयासाठी प्रचंड तयारी करण्यात येऊन मोठा मंडप लावण्यात आलेला होता. जवळपास 2 हजार व्यक्तींच्या जेवणाची व्यवस्था केलेली होती. प्रचंड गारपीट व जोरदार वाऱ्यामुळे मंडप उडून जाऊन या विवाह सोहळयात अडचण येऊन सर्व व्यवस्था मातीमोल झाल्याने जोशी कुटुंबियांना संकटाचा सामना करावा लागत आहे. शेतकऱ्याच्या झालेल्या प्रचंड नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.