बद्रीनाथ, केदारनाथमधून बर्फ गायब, तापमानाने मोडला 121 वर्षांचा रेकॉर्ड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

यंदा उकाडय़ाने देशभरातील नागरिकांचे जीणे मुश्कील झाले असून प्रचंड तापमानाने बद्रीनाथ, केदारनाथमधून बर्फ गायब होऊ लागला आहे. गेल्या वर्षीपर्यंत मार्च-एप्रिलमध्ये चारधाममध्ये चार फुटांपर्यंत बर्फ होता. मात्र यंदा एप्रिलच्या आधीच बर्फ वितळू लागला आहे. एप्रिलमध्ये अनेक राज्यांचा पारा चाळिशीपार जाण्याची भीती भारतीय हवामान खात्याने व्यक्त केली असून तापमानाचा पारा वाढतच राहिल्यास विदर्भासह नऊ राज्यांत उष्माघाताचा इशाराही देण्यात आला आहे.

सध्या तापमानवाढीने 121 वर्षांचा जुना रेकॉर्ड मोडला असून 1901 नंतर प्रथमच अनेक राज्यांच्या तापमानाने चाळिशी गाठली आहे. यंदा मार्चमधील सर्वाधिक तापमानाची नोंद दक्षिण-पश्चिम आणि मध्य हिंदुस्थानात झाली. तर नवी दिल्लीतील कमाल तापमान 36.8 अंश सेल्सिअस तर मुंबईत 33.2 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार यंदाच्या मार्च महिन्यात सर्वसामान्य तापमान 33.01 इतके होते. 1901 मध्येही सर्वसाधारण तापमान 32.5 अंश सेल्सिअस इतके होते. एका अधिकाऱयाने दिलेल्या माहितीनुसार सध्या कोरडी हवा असून पुढील दहा दिवस तरी उत्तर हिंदुस्थानात पावसाची शक्यता नाही. या परिस्थितीत तापमान आणखी वाढण्याची शक्यता आहे.

4 ते 8 एप्रिलदरम्यान दिल्लीचा पारा 40 च्या पुढे
4 ते 8 एप्रिलदरम्यान राजधानी दिल्लीचा पारा 40 ते 41 अंश सेल्सिअसच्या पुढे जाण्याची शक्यताही हवामान खात्याने वर्तविली आहे. तसेच नऊ राज्यांना उष्माघाताचा अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भासह राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, छत्तीसगढ, हरयाणा, दिल्ली, गुजरात, झारखंडमध्ये उष्माघाताची शक्यता असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले.

उत्तर हिंदुस्थानात वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे हवेची गती कमी झाली आहे. त्यामुळे तापमानात वाढ झाली आहे. यंदा वेस्टर्न डिस्टर्बन्सचा प्रभाव मार्चच्या तिसऱया आठवडय़ातच संपला असून याचाच परिणाम म्हणजे वेळेआधीच उत्तर आणि मध्य हिंदुस्थानात तापमानात प्रचंड वाढ झाली आहे.
– स्कायमेट