
नगर जिल्हा रुग्णालयातील आगीच्या घटनेप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात कारवाईच्या शक्यतेने जिल्हा शल्यचिकित्सक सुनील पोखरणा यांनी न्यायालयात केलेला अटकपूर्व जामीन अर्ज अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. आर. नातू यांनी शनिवारी मंजूर केला आहे. पोखरणा यांना जामीन मंजूर करताना न्यायालयाच्या परवानगीशिवाय नगरबाहेर जाऊ नये, असेही निर्देश दिले आहेत.
आगीच्या घटनेत 14 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी तोफखाना पोलिसांनी स्वतःहून गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यात कारवाई होण्याच्या शक्यतेने पोखरणा यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. न्यायालयाने त्यांना अंतरीम जामीन दिला होता. त्यानंतर शिवसेना उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनीही हस्तक्षेप याचिका दाखल करुन पोखरणा यांच्या जामिनाला विरोध दर्शविला होता. या प्रकरणी 26 नोव्हेंबर सुनावणी झाली होती. या प्रकरणी न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्जावर दिला. पोखरणा यांनी तपासात सहकार्य करावे, साक्षीदारांवर दबाव आणू नये, न्यायालयाच्या परवानगीशिवाय नगरबाहेर जाऊ नये, अशा अटींवर न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.































































