बजाज चेतक सुसाट… चौपट विक्री वाढली…एप्रिलमध्ये ठरली अव्वल…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या महामारीत टू व्हिलरची मागणी वाढली असून एप्रिलमध्ये बजाजच्या चेतक इलेक्ट्रिकची मागणी तुफान वाढली आहे. मार्च महिन्यात पहिल्या स्थानावर असलेल्या टीव्हीएस आयक्यूबला मागे टाकत बजाज चेतकने पहिले स्थान पटकावले आहे. एप्रिलमध्ये बजाज चेतकच्या मागणीत 464 टक्क्यांनी वाढ झाली. तसेच चौपट विक्री वाढली आहे.

सध्या हिंदुस्थानी बाजारपेठेत अनेक इलेक्ट्रिक स्कूटर उपलब्ध असून पेट्रोल स्कूटरच्या तुलनेत इलेक्ट्रिक स्कूटरची मागणी कमी आहे. त्यात बजाज चेतक आणि टीव्हीएस आयक्यूब या इलेक्ट्रिक स्कूटरला जास्त मागणी आहे. त्यांच्या मोठ्या ब्रँडमुळे त्यांची मागणी वाढत आहे. त्यामुळे बजाज चेतक आणि टीव्हीएस आयक्यूब यांच्यात जबरदस्त स्पर्धा सुरु आहे.

एप्रिलची आकडेवारी पाहिली असता बजाज चेतकने या महिन्यात एकूण 508 युनिट्सची विक्री केली आहे. मार्चमध्ये त्यांच्या केवळ 90 युनिट्सची विक्री झाली होती. या तुलनेत बजाज चेतकची मागणी एप्रिल महिन्यात 464 टक्क्यांनी वाढली आहे. आता कंपनीने पुणे, बंगळुरू आणि दिल्लीनंतर देशातील अन्य शहरांमध्ये विक्री करण्याची घोषणा केली आहे. एप्रिलमध्ये टीव्हीएस आयक्यूबची एकूण 307 युनिट्सची विक्री झाली होती. तर मार्चमध्ये ती 355 युनिट्स होती.

नवीन बजाज चेतक स्कूटर हिंदुस्थानी बाजारपेठेत अर्बन आणि प्रीमियम अशा दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर 95 किलोपर्यंतची रेंज देते. तर इको मोडमध्ये असताना आपल्याला 85 किमीची रेंज मिळते. ही इलेक्ट्रिक स्कूटर 6 रंगांमध्ये उपलब्ध असून बजाज चेतक इलेक्ट्रिकच्या बॅटरीवर 3 वर्षाची किंवा 50,000 किमीची वॉरंटी देत आहे. त्याचबरोबर कंपनीचा दावा आहे की त्याची बॅटरी 70,000 किलोमीटरपर्यंत चालेल. त्याची बॅटरी 1 तासात 25 टक्के आणि 5 तासात पूर्ण चार्ज होते. चेतक उरबेनची किंमत 1,42,620 रुपये आहे. त्याच वेळी चेतक प्रीमियमची किंमत 1,44,620 रुपये आहे.