पालिका पत्रकारांसाठी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे कल्याण निधी योजना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई महापालिकेचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांसाठी महापालिकेतर्फे ’हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे पत्रकार कल्याण निधी’ आरोग्यदायी योजना दिवाळीपासून सुरू करण्यात येत असल्याची घोषणा महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली. पालिका पत्रकारांना दुर्धर आजार झाल्यास पालिका रुग्णालयात सर्व वैद्यकीय उपचार मोफत होणार आहेत. तसेच पत्रकाराच्या कुटुंबीयांनाही वैद्यकीय उपचार घेता येणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या आदेशाने पत्रकारांसाठी ही योजना राबविण्यात येत असल्याचे महापौरांनी सांगितले.

भायखळा राणी बाग येथील पेंग्विन कक्षातील सभागृहात दिवाळीनिमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमावेळी महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकारांसाठी या महत्वाकांक्षी घोषणा केली. या योजनेत खासगी रुग्णालयात उपचार करण्यासाठी आर्थिक मदत देण्यात येणार असून पत्रकाराचा आजाराने, अपघाताने मृत्यू झाल्यास कुटुंबीयांना आर्थिक मदतही करण्यात येणार आहे.

या योजनेच्या घोषणेवेळी उपमहापौर अॅड. सुहास वाडकर, शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत, आमदार यामिनी जाधव, सभागृह नेत्या विशाखा राऊत, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, विरोधी पक्षनेते रवी राजा, समाजवादी पक्षाचे गटनेते तथा आमदार रईस शेख, राष्ट्रवादी पक्षाचे गटनेते राखी जाधव, सुधार समिती अध्यक्ष सदानंद परब, शिक्षण समिती अध्यक्षा संध्या दोशी, स्थापत्य समिती (शहर) अध्यक्ष श्रद्धा जाधव, शिक्षण समितीच्या माजी अध्यक्षा अंजली नाईक, नगरसेविका हेमांगी वरळीकर, शिक्षण अधिकारी महेश पालकर आणि वार्ताहर संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

पत्रकारांना दिलासा
वार्तांकन करताना अनेकदा पत्रकरांना आरोग्याच्या समस्या भेडसावतात. हृदयविकार, किडनी, मेंदू, कॅन्सर, टीबी इत्यादी आजारांचा सामना करावा लागतो. या आजारांवर खासगी रुग्णालयात उपचार घेणे परवडत नाही. त्या पार्श्वभूमीवर, पालिका वार्ताहर संघाने या योजनेचा पाठपुरावा करून ही योजना मंजूर करून घेतली आहे. वार्ताहर संघाचे अध्यक्ष विष्णू सोनवणे यांनी, पत्रकारांसाठी ही आरोग्यदायी योजना महत्वाची असल्याचे सांगत महापौर, गटनेते, विविध समिती अध्यक्ष आदींचे आभार मानले.