
शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली आणि अजित पवार यांचा गट थेट सत्तेत सहभागी झाला. त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथही घेतली. याबाबत आता काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी एक विधान केले आहे. अजित पवार फुटणार याची कुणकुण लागली होती, असे ते म्हणाले. माध्यमांशी बोलताना त्यांनी हे विधान केले.
ते पुढे म्हणाले की, महाविकास आघाडीचे चांगले सुरू असलेले सरकार पाडून शिंदे-फडणवीस सत्तेत आले. हे सरकार सत्तेत येऊन वर्ष होत नाही तोच अजित पवारांनी आणखी एक धक्का दिला. अजित पवारांच्या बंडाची कुणकुण होती. काहीतरी शिजत होते, याचा आम्हाला वास येत होता.
शिंदे गेले तरी महाविकास आघाडी म्हणून आम्ही तिन्ही पक्ष एकत्र होतो. वज्रमूठ सभेमध्येही ती एकी दिसली. लोकांचा प्रतिसादही आम्हाला मिळत होता. लोकांचा विश्वास गर्दीतून दिसत होता. त्या काळात जे सर्व्हे झाले त्यात तिन्ही पक्ष एकत्र निवडणुकीला सामोरे गेले तर मोठा विजय मिळेल. तसेच लोकसभेला 38 आणि विधानसभेला 180 जागा मिळतील हे स्पष्ट झाले होते. त्याचवेळेस वाटत होते की भाजपला ही आघाडी तोडण्याशिवाय गत्यंतर नाही. ईडी, सीबीआय आणि तपास यंत्रणांच्या कारवाईतून तसे सिग्नही मिळत होते, असेही थोरात म्हणाले.
अजितदादांच्या बंडाची कुणकुण होती
अजितदादांच्या बंडाची कुणकुण कधी लागली असे विचारले असता थोरात म्हणाले की, अजित पवार हे वज्रमूठ सभेमध्ये फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल करायचे. मात्र देवेंद्र फडणवीस यांना मोकळे सोडायचे. मलाच नाही तर जनतेलाही हे जाणवत होते आणि याचा परिणाम शेवटी दिसला. त्यांनी याआधी पहाटेचा शपथविधीही घेतला होता. त्यामुळे त्यांचे मधुर संबंध होते. शेवटी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन भाजपला आघाडी तोडण्याची गरज होती आणि तसे घडेल असे वाटतही होते. मधल्या काळात पवारांनी राजीनामा दिला हा त्याचाच सिग्नल होता, असेही ते म्हणाले.
View this post on Instagram
…तर राष्ट्रवादी उभी राहील
अजित पवार आपल्यासोबत अनेक आमदार घेऊन गेले आहेत. पण शरद पवार फक्त हात जोडून महाराष्ट्रभर फिरले तरी राष्ट्रवादी पुन्हा उभी राहीलय. तसेच एकमेकांच्या मदतीने आमच्याही चांगल्या जागा येतील, असेही थोरात यावेळी म्हणाले.
राष्ट्रवादीला सोबत घेतल्याने अनेक भाजप आमदार नाराज, एकनाथ खडसेंचा मोठा दावा





























































