शेन वॉर्नच्या ‘शतकातील सर्वोत्तम’ चेंडूला २५ वर्ष पूर्ण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

क्रिकेट हा विक्रमांचा खेळ आहे आणि इथे प्रत्येक सामन्यात काहीतरी विक्रम होत असतो. अशा विक्रमी सामन्यातील काही क्षण हे क्रीडा रसिकांच्या मनात कायम घर करून असतात. असाच एक क्षण म्हणजे जगातील फिरकीपटूंचा गॉड शेन वॉर्नने १९९३ मध्ये टाकलेला एक चेंडू. क्रिकेटमध्ये या चेंडूला ‘शतकातील सर्वोत्तम’ चेंडू अशी उपाधी मिळाली आहे आणि म्हणूनच आज २५ वर्षानंतरही ती आठवण चाहत्यांच्या मनात उसळी घेत आहे.

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात ४ जून १९९३ ला मँचेस्टर येथे एक कसोटी सामना खेळवला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा शेन वॉर्नने इंग्लंडचा फलंदाज माईक गेटिंगला अफलातून त्रिफळाचीत केले आणि ते पाहिल्यावर बऱ्याच जणांनी बोटे तोंडात घातली होती. वॉर्नच्या चेंडूने केलेली ही जादु अजूनही क्रीडारसीक विसरलेले नाही.

आपल्या या जादुई चेंडूबाबत वॉर्न म्हणाला की, ‘माझा चेंडू ‘बॉल ऑफ द सेंचुरी’ ठरला, याचा मला गर्व आहे. प्रत्येक वेळी आपल्याला चेंडू वेगळा कसा टाकता येईल, असा विचार मी करत होतो. माईक गेटींग हा चांगल्याप्रकारे फिरकी गोलंदाजी खेळायचा. त्याचासारखा खमका फलंदाज माझ्या चेंडूवर फसला, याचा मला आनंद आहे.’

वॉर्नने इंग्लंडविरुद्ध पहिल्यांदाच अॅशेस मालिकेमध्ये खेळताना भल्या भल्या फलंदाजांची पळता भूई केली होती. वॉर्नच्या गुगलीपुढे फलंदाज गोधळून जायचे. वॉर्नने कसोटी आणि एक दिवसीय क्रिकेटमध्ये मिळून १ हजार पेक्षा जास्त बळी मिळवले आहेत.