
अहिल्यानगर जिल्ह्यात खरिपाची पेरणी 101 टक्के झाली असून, एक लाख 48 हजार 384 हेक्टरवर कापूस, तर एक लाख 82 हजार 988 हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला आहे. कापूसवाढीच्या व बेंडे लागण्याच्या, तर सोयाबीन शेंगा लागण्याच्या अवस्थेत आहे. मात्र, कापसावर रस शोषणारी कीड, मक्यावर ‘लष्करी अळी’, तर सोयाबीन पिकावर ‘उंट अळी’चा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे शेतकऱयांच्या अडचणींत वाढ झाली आहे.
यंदा खरीप पेरणीसाठी सात लाख 16 हजार 209 हेक्टर क्षेत्र निश्चित केले असून, आतापर्यंत सात लाख 23 हजार 627 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली. मका पिकाची 139 टक्के म्हणजे एक लाख नऊ हजार 97 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली. भाताचा पेरा 100 टक्के म्हणजे 18 हजार 748 हेक्टर क्षेत्रावर झाला आहे. बाजरीला यंदा हवा तसा प्रतिसाद शेतकऱयांनी दिला नाही. आतापर्यंत फक्त 70 टक्के पेरणी झाली. तूर, उडदाची पेरणी 100 टक्के, तर मुगाचा पेरा 94 टक्के झाला आहे.
जवळपास सर्वच पिकांची वाढ सुरू असून, भाताचे पीक समाधानकारक आहे. बाजरी पिकाला फुटवे फुटले असून, बाजरी फुलोरा आणि पक्क्वतेच्या अवस्थेत आहे. तूर वाढीच्या अवस्थेत असून, समाधानकारक आहे. कापसाला पाते फुटत असून, बोंडे लागण्याच्या अवस्थेत आहे. मात्र, या पिकाला रस शोषणारी कीड आणि फुलकिडे लागले आहेत. पाथर्डी, राहुरी तालुक्यांतील पिकावर मावा व तुडतुडे किडाचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीवर येऊन ठेपला आहे. शेवगाव तालुक्यात फुलकिडींचा प्रादुर्भाव, तर नेवासा तालुक्यात कापसावर ‘लाल्या’ रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.
सहा तालुक्यांत मका अडचणीत
– अहिल्यानगर जिल्ह्यात मका पिकाची लागवड एक लाख 10 हजार हेक्टरवर झाली. हे पीक कणसे लागण्याच्या आणि पक्वतेच्या अवस्थेत आहे. मात्र, या पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. अकोले तालुक्यात मका आर्थिक अडचणीत आहे. नगर, कोपरगाव, नेवासा, पारनेर व संगमनेर या पाच तालुक्यांत लष्करी अळीने बेजार केले आहे. त्यामुळे शेतकऱयांना आर्थिक झळ बसण्याची शक्यता आहे.