
गेली अनेक वर्षे रखडलेल्या वांद्रे येथील सरकारी वसाहतींचा पुनर्विकास आता मार्गी लागणार आहे. 12 हेक्टरवर कर्मचाऱयांसाठी निवासस्थाने उभारण्यात येणार असून कोरीयन कंपनीच्या माध्यमातून कृती आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी विधान परिषदेत दिली. वांद्रे वसाहतींच्या पुनर्विकासाचा मुद्दा शिवसेना आमदार अनिल परब यांनी मांडला. त्याला सर्वपक्षीयांनी पाठिंबा दिला.
वांद्रे पूर्व येथील सरकारी वसाहतींचा पुनर्विकास गेले अनेक वर्षे रखडला आहे. 50 ते 60 वर्षे जुन्या असलेल्या 370 इमारतींमध्ये 4 हजार 782 सदनिका असून त्यांची दुरवस्था झाली आहे. मात्र, वसाहतींचा पुनर्विकास इथेच 96 एकर जागेवर करा, त्यासाठी तातडीने कार्यवाही केली जावी, अशी मागणी आमदार अनिल परब यांनी केली होती. त्यावर पुनर्विकासासाठी नेमण्यात आलेली कोरियन कंपनी ऑक्टोबरपर्यंत सरकारला कृती आराखडा सादर करणार आहे. त्यानंतर निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन बांधकाममंत्र्यांनी दिले.
दरम्यान, सरकारी कर्मचाऱयांच्या तीन पिढय़ा इथेच गेलेल्या असल्यामुळे त्यांना इथेच मालकी तत्त्वावर घरे दिली जावीत, पुनर्विकासासाठी कालमर्यादा निश्चित करावी, न्यायालये, महसूल विभाग आणि नोंदणीकरण करण्यात आलेल्या सोसायटय़ांना वेगळा भूखंड देण्यात यावा अशी मागणी सचिन अहिर, प्रवीण दरेकर, भाई गिरकर यांनी केली.

























































