वांद्र्यात दरोड्याचा प्रयत्न करणारा गजाआड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वांद्रे पश्चिमकडील एका नामांकित आर्टिफिशिल आणि फॅशन ज्वेलरीच्या दुकानात घुसून बंदुकीचा धाक दाखवत एकाने दरोडा टाकायचा अयशस्वी प्रयत्न केला होता. आरोपीने ओळखले जाऊ नये याकरिता रेनकोट घातलेला आणि तोंडावर मास्क लावला होता. इतकेच करून तो थांबला नाही तर दुकान मालकास खंडणीसाठीदेखील धमकावले. जम्मू-कश्मीरहून येऊन आरोपीने हे कृत्य केले. पण युनिट-9 च्या पथकाने वेळीच त्याच्या मुसक्या आवळल्या.

स्टोअरमध्ये रेनकोट घातलेल्या मास्कधारी व्यक्तीने सेल्समनला ‘कॅश और डायमंड दो’ असे म्हणत धमकावले. याप्रकरणी वांद्रे पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना म्यान्युअल गोन्सालविस रोड येथे घडली.

आयनॉक्स ज्वेलर्समध्ये मॅनेजर म्हणून काम करणाऱया शबाना रंगीला (48) यांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली. याप्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान दया नायक व त्यांचे सहकारी निरीक्षक दीपक पवार, सपोनि उत्कर्ष वझे, महेंद्र पाटील, उपनिरीक्षक स्नेहल पाटील व पथकाने तपास सुरू केला. तांत्रिक बाबींच्या माध्यमातून शोध घेत असताना दुकानात घूसून शस्त्राच्या आधारे दहशत निर्माण करणारा आरोपी वांद्रे रेल्वे स्थानक परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने त्या परिसरात सापळा रचून रियाझ अहमद अब्दुल गनी वार (29) या आरोपीला पकडले. रियाझ हा जम्मू-कश्मीरचा असून आठ दिवसांपूर्वी तो मुंबईला आला होता.