
रस्त्यातील दगड चुकविण्याच्या नादात मोटारीवरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात तरूण ठार झाला असून त्याचे दोन मित्र जखमी झाले आहेत. हा अपघात बुधवारी रात्री आठच्या सुमारास बाणेर रस्त्यावरील माऊली पेट्रोल पंपासमोर घडला आहे.
गणेश सोमेश्वर घनचक्कर (वय 25, रा. पाषाण) असे मृत्युमुखी पडलेल्या चालकाचे नाव आहे. साहिल मधुकर कुलकर्णी आणि सचिन सतिश जाधव हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलीस हवालदार अशोक वणवे यांनी चतुःशृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास गणेश, साहिल आणि सचिन मोटारीतून जात होते. त्यावेळी गणेश घनचक्कर मोटार चालवित होता.
बाणेर रस्त्यावरील माऊली पेट्रोल पंपावर जवळ रस्त्यावरील दगड चुकविण्याच्या नादात मोटार दुभाजकाला धडकली. त्यामुळे मोटार पलटी होउन झालेल्या अपघातामध्ये गणेश जागीच ठार झाला. त्याचे मित्र साहिल आणि सचिन जखमी झाले आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक कपिल भालेराव तपास करीत आहेत.





























































